100 ‘5G Use Case Labs’ for educational institutes across the country
देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’
पंतप्रधानांच्या हस्ते सातव्या भारत मोबाईल काँग्रेस(आयएमसी) चे उद्घाटन
“भारत केवळ 5जी नेटवर्कचा देशभरात विस्तार करत नसून 6जी च्या बाबतीत आघाडीवर राहण्यावर देखील अधिक भर देत आहे”
21 वे शतक म्हणजे भारताच्या वैचारिक नेतृत्वाचे युग ठरते आहे”
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सातव्या भारत मोबाईल काँग्रेस 2023 संमेलनाचे उद्घाटन केले. भारत मोबाईल काँग्रेस (आयएमसी) या आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञानविषयक मंचाचे ‘जागतिक डिजिटल नवोन्मेष’ या संकल्पनेवर आधारित संमेलन 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
सिक्स- जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्याच्या दिशेनं सरकार प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत ११८ व्या क्रमांकावरून ४३ व्या स्थानावर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत ५ जी कनेक्टिव्हीटी आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.
देशात ५ जी तंत्रज्ञान सुरु झाल्यापासून चार लाख ५ जी स्थानकं उभारण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. ५ जी तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी शंभर ५जी प्रयोगशाळा प्रधानमंत्र्यांनी देशभरातल्या शैक्षणिक संस्थांना प्रदान केल्या. ५ जी तंत्रज्ञानाशी निगडित संधींना चालना देण्यासाठी या प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. देशात सिक्स जी साठी शिक्षण आणि स्टार्ट-अप इकोसिस्टम तयार करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गेल्या दहा वर्षांत प्रधानमंत्री मोदींनी दूरसंचार क्षेत्राचा कायापालट केला असल्याचं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासक, उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान बळकट करणे हे या आयएमसी2023 च्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’ची देणगी दिली.
पंतप्रधानांनी दालन क्र.5 मधील प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले आणि प्रदर्शनाची पाहणी केली.
या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी देखील त्यांचे विचार मांडले. रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीचे अध्यक्ष आकाश एम.अंबानी यांनी युवा पिढीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सवय रुजवून त्यांचे जीवन सुधारणे आणि त्यायोगे भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक सामर्थ्य प्रदान करणे यासंदर्भातील पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल भारताच्या रुपात मांडलेल्या आणि ज्यामुळे देशातील डिजिटल पायाभूत सुविधा वाढत्या वेगाने विकसित झाल्या त्या संकल्पनेचे भारती एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी पुन्हा स्मरण केले. पंतप्रधानांच्या जेएएम त्रिसूत्रीसंकल्पनेमुळे झालेले परिवर्तन तसेच भारतातील डिजिटल परिवर्तनाची जगणे घेतलेली नोंद या बाबी त्यांनी यावेळी अधोरेखित केल्या. ते म्हणाले की भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा (डीपीआय) जगातील अनेक देशांना हेवा वाटण्याचा विषय आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे आणखी एक सशक्त उदाहरण म्हणजे मेक इन इंडिया उपक्रम असे सांगून मित्तल म्हणाले की, गेल्या एका वर्षातच उत्पादन क्षेत्राने कित्येक भराऱ्या घेतल्या आहेत. मोठ्या प्रमाणातील डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्राच्या बाबतीत तर भारत जागतिक स्तरावरील आघाडीचा देश झाला आहे असे ते म्हणाले. हा जगभरातील सर्वात वेगवान 5 जी सेवा विस्तार असेल असे ते म्हणाले.
आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी भारताच्या डिजिटल परिवर्तनामध्ये केलेल्या दृष्ट्या नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि सर्वांना लाभदायक ठरणाऱ्या ‘अंत्योदय’ या तत्वावर आधारित डिजिटल समावेशनाप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची प्रशंसा देखील केली.
पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या कामात व्होडाफोन आयडिया कंपनी एक जबाबदार भागीदाराची भूमिका बजावण्यास कटिबद्ध आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 6 जी सारख्या क्षेत्रांमध्ये भविष्यवादी तंत्रज्ञानाचे मापदंड विकसित करण्यात भारत सक्रियतेने सहभागी आहे याचा उल्लेख त्यांनी केला. सरकारने उद्योजकांना देऊ केलेल्या पाठबळाबद्दल बिर्ला यांनी सरकारचे आभार मानले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 21 व्या शतकातील बदलत्या काळात, कोट्यवधी लोकांची आयुष्ये बदलून टाकण्याचे सामर्थ्य अशा कार्यक्रमात आहे. तंत्रज्ञानाची जलदगती अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “येथेच आणि हाच भविष्यकाळ आहे.” या संमेलनात दूरसंचार, तंत्रज्ञान आणि संपर्क या क्षेत्रातील भविष्यकाळाची झलक दाखवणारे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. 6 जी, कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर्स, ड्रोन आणि अवकाश क्षेत्र, खोल समुद्र, हरित तंत्रज्ञान तसेच इतर अनेक क्षेत्रांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, “भविष्यकाळ हा एकदमच वेगळा असणार आहे आणि आपली तरुण पिढी तंत्रज्ञानविषयक क्रांतीचे नेतृत्व करत आहे हे पाहणे अत्यंत आनंदाचे आहे.”
नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या संधी भूतकाळात गमावल्या असल्याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. भारताने विकसित तंत्रज्ञानामध्ये आपली प्रतिभा आधीच सिध्द करून दाखवली आहे, असे सांगत त्यांनी भारताच्या आयटी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा उल्लेख यावेळी केला. “21 व्या शतकाचा हा काळ हा भारताच्या वैचारिक नेतृत्वाचा काळ आहे”,यावर भर देत मोदींनी प्रतिभावान वैचारीक नेत्यांना इतरांना अनुसरता येतील असे नवीन डोमेन तयार करण्याचे आवाहन केले.त्यांनी यासाठी UPI चे उदाहरण दिले जे आज डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहे. “भारताकडे क्रियाशील युवावर्ग आणि चैतन्यशील लोकशाहीची शक्ती आहे”, असे पंतप्रधानांनी अभिमानाने यावेळी सांगितले. इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सदस्यांना, विशेषत: तरुण सदस्यांना या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले. “आज, जेव्हा आपण विकसित भारत बनविण्याचे ध्येय साकार करत आहोत, तेव्हा विचारवंत म्हणून अग्रेसर रहाणे संपूर्ण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणून संक्रमण करु शकते”, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचेअध्यक्ष आकाश एम अंबानी, भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’”