Strictly follow the guidelines laid down while starting school:- Instructions of the Minister of Education.
शाळा सुरू करताना आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश.
मुंबई: राज्यात कोविड-१९ चा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावास काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. त्यानुसार येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत सर्व जिल्ह्यांमधील परिस्थितीचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.
शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, यासाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करायचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. कोरोनामुळे राज्यात बंद असलेल्या शाळा येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत.
ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांचा दर अधिक असेल तिथे जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. शालेय शिक्षण आयुक्त, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिकांमधील संबंधित अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.