Workshop on ‘Rural and Community Based Tourism’ by Tourism Department.
पर्यटन विभागातर्फे ‘ग्रामीण व समाजाधिष्ठीत पर्यटन’ विषयावर कार्यशाळा.
पुणे : पारंपारिक सामाजिक जीवनाची संकल्पना बदलत असून सामाजिक ऐक्य व संस्कृती टिकवण्यासाठी ग्रामीण भागाचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे ग्रामीण व कृषी पर्यटनाद्वारे समाज, संस्कृती, साहित्य, लोककला समजून घेत समाजाधिष्ठीत पर्यटनाची संकल्पना रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ.धनंजय लोखंडे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचे विभागीय पर्यटन कार्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील ट्रॅव्हल अँड टुरिझम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त मुळशी तालुक्यातील करमोळी येथे ‘ग्रामीण व समाजाधिष्ठीत पर्यटन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालिका सुप्रिया करमरकर-दातार, प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे, मुळशी तालुक्यातील कृषी पर्यटन केंद्र प्रमुख दत्ता शेळके, रामचंद्र भुमकर, उपसरपंच रुपाली साठे आदी उपस्थित होते.
श्रीमती करमरकर-दातार म्हणाल्या, ग्रामीण भागामधील पारंपारिक सण व उत्सव, यात्रा यांची संस्कृती व महत्त्व समजून घेणे हे राज्य शासनाने ठरवलेल्या ग्रामीण व समाजाधिष्ठीत पर्यटनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील. कृषी पर्यटनाबरोबरच नैसर्गिक संपन्नता लाभलेल्या ग्रामीण भागामध्ये साहसी पर्यटनाचा अवलंब कशा पद्धतीने करता येईल याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ.घोरपडे यांनी प्रास्ताविकात कोविड – १९ काळामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे असे नमूद करत यादरम्यान देशांतर्गत पर्यटनामध्ये झालेल्या वाढीकडे लक्ष वेधले. ‘बेस्ट प्रॅक्टिस’ अंतर्गत महाविद्यालयातील पर्यटन विभागाने करमोळी गावामध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला देत ग्रामीण गावामध्ये पर्यटनाचे महत्व विशद केले.
दत्ता शेळके यांनी ग्रामीण व कृषी पर्यटन केंद्राची संकल्पना प्रत्यक्षात मांडत मुळशी तालुक्याला लाभलेल्या नैसर्गिक संपन्नतेची माहिती देऊन कृषी पर्यटनासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेनंतर उपस्थित गावकऱ्यांनी पर्यटनविषयक विचारलेल्या विविध शंकांना मान्यवरांनी उत्तरे देत शंकानिरसन केले. या कार्यशाळेचे आभासी (ऑनलाइन) पद्धतीने थेट प्रक्षेपणही करण्यात आले.