Deputy Chief Minister congratulates Dr Prabha Atre and other Padma Award winners on being declared ‘Padma Vibhushan’
पद्मविभूषण’ जाहीर झालेल्या डॉ.प्रभा अत्रे यांच्यासह ‘पद्म’पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन.
उद्योजक सायरस पुनावाला व नटराजन चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन.
मुंबई :- महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मविभूषण’, उद्योग व व्यापार क्षेत्रातील कामगिरीसाठी सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण’, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिम्मतराव बावसकर, डॉ. भिमसेन सिंगल, डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी, सुलोचना चव्हाण आणि सोनू निगम यांना कलाक्षेत्रातील कार्यासाठी, अनिलकुमार राजवंशी यांना विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला असून सर्व ‘पद्म’पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’पुरस्कार जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील तसंच देशातील सर्व मान्यवरांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं असून देशाच्या, समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे माजी प्रमुख, जनरल बिपीन रावत यांना ‘पद्मविभूषण’, तर डॉ. बालाजी तांबे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जनरल बिपीन रावत यांच्या देशसेवेबद्दल, तसंच डॉ. बालाजी तांबे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.