India is in a better position today to meet the challenges of the future, says President.
भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आज उत्तम स्थितीत आहे – राष्ट्रपतींचे प्रतिपादन.
नवी दिल्ली : भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आज उत्तम स्थितीत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशपर भाषणात त्यांनी आज सांगितलं, की २१ व्या शतकाकडे हवामान बदलाचं युग म्हणून पाहिलं जात आहे.
भारतानं अक्षय उर्जेसाठी आपल्या साहसी आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टांबरोबरच जागतिक मंचावर नेतृत्वाची स्थिती निर्माण केली आहे.वैयक्तिक स्तरावर आपल्यापैकी प्रत्येकजण गांधीजींच्या सल्ल्यानुसार आपल्या आसपासची स्थिती सुधारण्यात योगदान देवू शकतो, असं ते म्हणाले.
भारतीय राज्यघटना हा आपल्या सामूहिक चैतन्याचा जीवंत दस्तऐवज असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या वैविध्यपूर्ण आणि यशस्वी लोकशाहीची जगभरात प्रशंसा केली जाते. आपल्या संविधानाचं स्वरुप व्यापक आहे. त्यात राज्यसंस्थेच्या कामकाजाच्या व्यवस्थेचं विवरण आहे. तर, संविधानाच्या संक्षिप्त प्रस्तावनेत लोकशाह, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाची मार्गदर्शक तत्व यांचा गर्भित उल्लेख आहे. या आदर्शांमधूनच एका मजबूत आधारशिलेची निर्मिती झाली आहे. त्यावर आपलं भव्य गणतंत्र भक्कमपणे उभं आहे, असं ते म्हणाले.
मानव समुदायाला एकमेकांच्या मदतीची आज सर्वाधिक गरज आहे. कोरोना विरोधातला लढा अजून सुरुच आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आघात झाला आहे. ही स्थिती मानवजातीसाठी एक असाधारण आव्हान बनली आहे. अशा कठीण काळात आपण कोरोना विषाणूच्या विरोधात असाधारण दृढसंकल्प आणि कार्यक्षमता दाखवली. पहिल्या वर्षातच आपण आरोग्य सेवेच्या मूलभूत सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण केलं. शिवाय इतर देशांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. दुसऱ्या वर्षापर्यंत आपण स्वदेशी लस विकसित केली, जगाच्या इतिहासातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु केली. यात सगळ्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असं राष्ट्रपती म्हणाले.
संकटाच्या या काळात रुग्णांच्या देखभालीसाठी आपला जीव धोक्यात घालणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. केंद्र आणि राज्य स्तरावर लोकसेवक, धोरणकर्ते, प्रशासक आणि इतरांनी काळानुरुप पावलं उचलली. या सर्व प्रयत्नांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा वेग घेतला आहे. सर्व आर्थिक क्षेत्रांमधे सुधारणा आणि आवश्यकतेनुसार सहाय्य देण्यासाठी सरकार सातत्यानं सक्रीय आहे. लोकांना रोजगार आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यात छोट्या आणि मध्यम उद्योगांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जगात आघाडीच्या ५० अभिनव अर्थव्यवस्थांसाठी भारतानं आपलं स्थान निर्माण केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात आपण प्रभावी प्रगती केली आहे. आता युवा पिढीसाठी संधीची नवी दारं खुली होत आहेत. त्याचा लाभ उठवत आपल्या युवकांनी यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. याच उर्जा, आत्मविश्वास आणि उद्यमशिलतेसह आपला देश प्रगतीपथावर पुढे जात राहील, आणि जागतिक समुदायामधे आघाडीचं स्थान नक्कीच प्राप्त करेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.