Celebrate Republic Day with great enthusiasm across the state by following the Corona Prevention Rules.
राज्यभरात मोठ्या उत्साहात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा.
मुंबई: राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुंबईत शिवाजीपार्क इथं राज्याचा मुख्य ध्वजवंदन सोहळा झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. प्रजासत्ताक दिनानिमीत्त राज्यातल्या नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. कोरोनाचं संकट असतांनाही राज्यानं विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना आपण सर्वांनी एकत्र येऊन नवा बलशाली महाराष्ट्र घडवायचा संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी केलं.
राजभवनातही राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई इथल्या विधान भवनात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळही उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानसभा सदस्य झीशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
पुण्यात शिवाजीनगर इथल्या पोलीस संचलन मैदानात झालेल्या ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य हस्ते ध्वजवंदन झालं. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त सौरभ राव यांनी राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी अपर आयुक्त डॉ.अनिल रामोड, उपायुक्त संतोष पाटील, संगीता आवाडे, माहिती उपसंचालक पुरुषोत्तम पाटोदकर यांच्यासह उपजिल्हाधिकारी, माजी सैनिक, विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्री. राव यांनी सशस्त्र पोलीस पथकाने दिलेली मानवंदना स्वीकारली.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथील प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महापौर बंगला आणि पालिका मुख्यालयात आयोजित सोहळ्यात ध्वजवंदन झालं. प्रजासत्ताक दिनानिमीत्त राज्यभरात आयोजित विविध सोहळ्यांमध्ये जवानांच्या वीर पत्नांचा सन्मान, विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या तसंच यशस्वीतांचा सत्कारही केला गेला.
ठाण्यातल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. कोरोनामुळे दिवंगत झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरच्या नियुक्ती पत्रांचं वाटप यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते केलं गेलं.
पालघर जिल्ह्यात ळगाव इथल्या पोलीस परेड मैदानात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन झालं. जिल्ह्यात डहाणू इथं झालेल्या कार्यक्रमात ९ तृतीयपंथीयांना प्रातिनिधिक स्वरूपात संजय गांधी योजनेचं प्रमाणपत्र दिलं गेलं
. नवी मुंबईत कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात कोकण विभागीय स्तरावरचा ध्वजवंदन सोहळा झाला. यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं.
रायगडमध्ये अलिबाग इथं झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री आदिती सुनिल तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. सिंधुदुर्गात पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांच्या पोलीस कवायत मैदानात मुख्य ध्वजवंदन झालं. यावेळी सामंत यांनी जिल्हातल्या पर्यटनाचा विकास करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेत असल्याची घोषणा केली.
नाशिक मध्ये पालकमंत्री पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन झालं. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक संजय वाघ तसेच पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार केला गेला.
जालन्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं.धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदूरबारमध्ये जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील तर हिंगोलीत पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली गेली. तसंच कोरोना प्रादुर्भावामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या नावे बँकेतल्या ५ लाख रुपयांच्या मुदतठेवीच तसंच वीर मातांना ४ एक जमीन दिल्याचं प्रमाणपत्र वितरीत केलं गेलं.
यवतमाळ मध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे तर नागपूरमध्ये पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. नागरपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग इथल्या मुख्यालयात स्मृती मंदिर परिसरात मर्यादित स्वयंसेवकांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झालं.
गोंदियातही राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यावर माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार केला गेला. बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे, उस्मानाबादेत पालकमंत्री पालकमंत्री शंकराव गडाख, साताऱ्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गडचिरोलीत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, वाशिममध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई, नांदेडमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
भंडाऱ्यात पालक मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यावर, दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. चंद्रपुरात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते, अहमदनगरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर सोलापूरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. प्रजासत्ताक दिनानिमीत्त सोलापुरातल्या श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात फुलांचा वापर करून तिरंग्याच्या रंगाची आरास केली आहे.