Balbharati is changing with the changing times with the help of new technology – Education Minister Prof. Varsha Gaikwad.
बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे – शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड.
बालभारतीचा ५५ वा वर्धापन दिन.
पुणे : बालभारतीचे आजवरचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा बालभारतीच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले. बालभारतीच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना त्या बोलत होत्या.
प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. नवी पिढी ही अधिक गतिमान आणि तंत्रस्नेही आहे. कोरोना काळाने या क्षेत्रापुढे देखील विविध आव्हान उभे केले आहेत. या अनुषंगाने मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी बालभारती प्रयत्नशील आहे. पुस्तकांच्या आशय आणि रचनेत मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत.
पुढील शैक्षणिक वर्षांपासून येणारी एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तके हा त्याचाच एक भाग आहे. राज्यातील शिक्षण तज्ज्ञांच्या साहाय्याने येत्या काळात अभ्यासक्रम आणि पुस्तकाच्या क्षेत्रात विविध प्रयोग केले जाणार आहेत. ही पुस्तके शिक्षणातील नवनवीन प्रवाहांना सामावून घेणारी, जागतिकीकरणाचे आव्हाने पेलणारी तसेच मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी असतील.
कोरोनाचे सर्व नियम पाळत साजरा झालेल्या या सोहळ्यास बालभारतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.