The income tax department seized more than Rs 6 crore in cash from a hawala operator in Madgaon.
प्राप्तिकर विभागाने मडगाव येथील हवाला ऑपरेटरकडून 6 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त केली.
मडगाव: गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक तयारीची देखरेख सुरु असताना, प्राप्तिकर विभागाने, 29.01.2022 रोजी, गोव्याच्या पोलीस महानिरीक्षकांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीवरून, मडगाव येथे छापे टाकले.
हवाला ऑपरेटरच्या मडगाव येथील निवासस्थानी ही रोकड असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार प्राप्तिकर विभागाने वॉरंट बजावले आणि प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान, हवाला ऑपरेटरने रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी त्याच्या निवासस्थानी एक छुपी पोकळ जागा बनवल्याचे आढळून आले, ज्यामध्ये रोख रक्कम सापडली होती. शिवाय, त्याच्या निवासस्थानी पार्क करण्यात आलेल्या कारमधील छुप्या भागात रोख रक्कम ठेवल्याचे देखील आढळून आले. जो विशेषतः रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या वाहतुकीसाठी बनवण्यात आला होता.
झडती आणि जप्तीच्या कारवाईत 6.20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. विभागाने चौकशी केली असता, हवाला ऑपरेटरने रोख रक्कम हवाला रक्कम असल्याचे सांगितले. तो गोव्यातील हार्डवेअर व्यापाऱ्यांसाठी हवाला व्यवहार करतो. मात्र, हवाला ऑपरेटरच्या जबाबात अनेक प्रकारची विसंगती आढळून आली आणि असे मानले जाते की ही रोख रक्कम गोव्यातील आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडण्यासाठी मतदारांना वाटण्यासाठी होती. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.
निवडणुकीदरम्यान, मतदारांना रोख रकमेचे वाटप त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी केले जाते, त्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीच्या उद्दिष्टांवर विपरित परिणाम होतो. बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आल्यामुळे त्याचा निवडणूक हेतूंसाठी वापर होण्याची शक्यता कमी होईल आणि गोवा राज्यात मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांच्या आयोजनाला मदत होईल. प्राप्तिकर विभागाने देखरेख यंत्रणा सतर्क केली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान रोख रकमेच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी किंवा लाच देण्यासाठी वापरल्या जाणार्या रोकड आणि इतर वस्तूंच्या हालचालींबाबत तक्रारी/माहिती नोंदवण्यासाठी प्राप्तिकर विभागाने तिसरा मजला, ट्रिस्टार बिल्डिंग, पट्टो, पणजी, गोवा येथे एक 24×7 नियंत्रण कक्ष देखील स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षाशी टोल फ्री क्रमांक 1800-233-3941 किंवा मोबाईल क्रमांक 8275803725 आणि 9403809343 किंवा goaelections@incometax.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.