Savitribai Phule Pune University’s Youth Award announced.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे, युवा पुरस्कार जाहीर.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक कार्य आदी क्षेत्रातील युवा पुरस्कारांचे वितरण केले जाते.
यंदाच्या वर्षीचे हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. या पुरस्कारांबरोबरच विद्यापीठाकडून विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यांचे वितरण विद्यापीठाच्या वर्धापनदिनी केला जाणार आहे.
युवा गौरव पुरस्कारांमध्ये क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार टेनिसपटू अंकिता रैना, कला क्षेत्रातील पुरस्कार धृपद धमार गायकीमधील गायक चिंतन मधुकर उपाध्याय, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांना आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील पुरस्कार विनायक सुभाष लष्कर यांना जाहीर करण्यात आला आहे. हे सर्व पुरस्कारार्थी विद्यापीठाचे व संलग्न महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
महाविद्यालयीन स्तरावर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रा. शंकर बोरमाने, विजय मेधाने, रघुनाथ टोचे यांना जाहीर झाला आहे. तर उत्कृष्ट महाविद्यालयीन प्राध्यापक डॉ. शशिकांत वागे, डॉ. विनय कुमार, डॉ. संजय औटी, डॉ. तुषार चांदवडकर यांना जाहीर झाला आहे.
उत्कृष्ट नवोपक्रमशील शिक्षक म्हणून डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. विठ्ठल बोरकर, डॉ. आकांक्षा काशीकर यांची निवड झाली आहे. यंदाचा उत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार शिल्पा मुजुमदार आणि प्रांजली देशपांडे यांना विभागून देण्यात येणार आहे. डॉ. संगीता ढमढेरे व डॉ. नितीन पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ. मीनल ओक आणि डॉ. बबन चव्हाण यांना देण्यात आला. उत्कृष्ट क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार डॉ. मुरलीधर गायकवाड व गौतम जाधव यांना जाहीर झाला आहे.