Omicron Variant dodges immune response and hence the surge: Director, ICMR NIV
कोविड विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आपल्या प्रतिकारशक्तीला हुलकावणी देतो म्हणून या प्रकारचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत तीव्र वाढ दिसते आहे : प्रा प्रिया अब्राहम, संचालक, राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था, पुणे
तुम्हाला संक्रमित करण्याची संधी या विषाणूला देऊ नका. ओमायक्रॉन सौम्य विषाणू नाही पण तीव्रता कमी असलेला आहे – डॉ.राजीव जयदेवन
“पाणी तसेच इतर द्रवरूप पदार्थांचे सेवन करत रहा, कोविड अनुरूप वर्तनाचे नियम पाळा”
मुंबई/गोवा : कोविड19 च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जनतेला याविषयी योग्य माहिती उपलब्ध व्हावी तसेच यासंदर्भातील विविध शंकांचं निरसन व्हावं या उद्देशाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि गोवा यांच्या वतीने आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
‘कोविड 19 च्या तिसऱ्या लाटे बाबत मूलभूत तथ्ये’ हा या वेबिनारचा विषय होता.
राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था, पुणेच्या संचालक प्रा.प्रिया अब्राहम आणि डॉक्टर राजीव जयदेवन या वेबिनारला वक्ते म्हणून उपस्थित होते.
कोविड 19 च्या तिसऱ्या लाटे बाबत मूलभूत तथ्ये’ याविषयीचे प्रश्न आणि शंकाचे त्यांनी उपयुक्त माहिती, मार्गदर्शन आणि सल्ले देऊन निरसन केले.
ओमायक्रॉन व्हेरियंट हा 5 वा ‘चिंताजनक व्हेरियंट’ आहे.
अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि आता ओमायक्रॉन हा सध्याचा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्थेच्या संचालक प्रा.प्रिया अब्राहम यांनी सांगितले. ओमायक्रॉनला जनूकामध्ये अनेक उत्परीवर्तने झाली- 50 पेक्षा जास्त उत्परीवर्तने, त्याच्या स्पाईक प्रोटीन मध्ये 30 अमिनो ऍसिड बदलातून ते प्रतीत होतात असे त्या म्हणाल्या.
कोविड19 विषाणूच्या कोणत्याही प्रकाराला प्रतिबंध केलाच पाहिजे असे स्पष्ट करत प्रा.प्रिया अब्राहम म्हणाल्या की हा विषाणू जितक्या जास्त प्रमाणात लोकांमध्ये पसरेल तितका तो स्वतःमध्ये जनुकीय परिवर्तन करण्याचा आणि त्याच्यावरील प्रतिबंधांनुसार सक्षम बनण्याचा प्रयत्न करेल. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे सौम्य संसर्ग होतो हे आपल्याला माहीत आहे, मात्र म्हणून आपण काळजी घेणे अजिबात कमी करता कामा नये, काळजी घेण्यात कुठेही कसर राहता कामा नये, कोविड अनुरूप वर्तनाचे नियम पाळले पाहिजेत असे आवाहन अब्राहम यांनी यावेळी केले.
या कोविड19 महामारीमध्ये आपल्या देशाच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली असून शेकडो सरकारी त्याच बरोबर खाजगी प्रयोगशाळांनी RT-PCR चाचण्या करण्याची क्षमता विकसित केली आहे, असेही अब्राहम यांनी स्पष्ट केले. आपण करत असलेल्या बहुतेक आरटी-पीसीआर चाचण्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा माग काढू शकतात. तसेच इन्साकॉग एक समग्र जनुकीय निर्धारणाद्वारे त्यावर देखरेख करत आहे- लक्ष ठेवत आहे आणि अतिशय बारकाईने हे पहात आहे की काही नवे उत्परिवर्तक तर तयार होत नाहीत ना, आपल्या प्रयोगशाळा भविष्यातील काही आव्हाने आल्यास, ती पेलण्यासाठी देखील पुरेशा प्रमाणात सज्ज आहेत असेही त्यांनी नमूद केले.
फ्लू सदृश आजाराविषयी बोलताना डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की युवा वर्गामध्ये फ्लू सदृश आजार दिसून आला, फ्लू हा सर्दीसारखा नाही. फ्लू हा गंभीर आजार आहे, ज्यात काही दिवसांसाठी आपण शारीरिक दृष्ट्या दुर्बल होतो, सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, अशक्तपणा आणि एखादे वेळा उठण्यासाठी अशक्य होते.
वयोवृद्धांमध्ये त्यांची खालावलेली प्रकृती, ओमायक्रॉन व्हेरियंट अधिकच तीव्र करतो आणि काही मोजक्या लोकांमध्ये विशेषकरून ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशांचे या विषाणूने बळीही घेतले आहेत, असे सांगत डॉ जयदेवन यांनी लसीकरणाचे महत्व नमूद केले. ताप, घसा दुखी, श्वसन विषयक तक्रारी, अंगदुखी तसेच बऱ्याचश्या लहान मुलांमध्ये 2 दिवस ताप येऊन तो झटकन बरा होतो ही ओमायक्रॉन व्हेरियंट चा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सर्वसाधारण पणे आढळणारी लक्षणे आहेत अशी माहिती डॉ जयदेवन यांनी यावेळी दिली.
सौम्य कोविड लक्षणे असलेल्या आणि सुदृढ व्यक्तींमध्ये जे घरीच उपचार घेत आहेत, त्यापैकी बहुतांश जणांच्या शरीरामध्ये या संसर्गाला प्रतिकार करण्याची क्षमता असते त्यामुळे विषाणूपासून सुटका व्हावी यासाठी गोळ्या/इंजेक्शनचा मारा करण्याची आवश्यकता नाही असा सल्ला डॉ.राजीव जयदेवन यांनी यावेळी दिला.
गृह विलगीकरणात असताना घ्यावयाच्या काळजी विषयी बोलताना डॉ राजीव जयदेवन म्हणाले की जेव्हा तुम्ही गृह विलगिकरणात असाल तेव्हा शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याकडे लक्ष द्या आणि त्यासाठी ओआरएस तयार करा आणि नियमितपणे ते पीत रहा कारण ज्यावेळी शरीराला संसर्ग होतो, त्यावेळी शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते असे ते म्हणाले. याशिवाय जोपर्यंत विशिष्ट लक्षणे नाहीत तोपर्यंत प्रतिजैविके घेण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी सांगितले.
या विषाणूच्या उच्च संसर्ग क्षमतेविषयी बोलताना डॉक्टर जयदेवन म्हणाले ‘अजिबात चूक करू नका’ हा धडा ओमायक्रॉन या विषाणूमुळे आपल्याला शिकवला आहे. हा विषाणू आपल्याकडे पुन्हा येत आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला याची जाणीव झाली पाहिजे. तुम्हाला संक्रमित करण्याची संधी या विषाणूला देऊ नका. ओमायक्रॉन सौम्य विषाणू नाही पण तीव्रता कमी असलेला आहे. मलेरिया पासून बचावासाठी तुम्ही डासांचा बंदोबस्त करता, कॉलरा पासून बचावासाठी स्वच्छ पाणी पिता, त्याच प्रकारे आपल्या सर्वांना हे माहीत आहे की कोविड-19 हवेतून पसरतो, त्याला आपल्या नाकावाटे किंवा तोंडावाटे प्रवेश करता येऊ नये म्हणून सर्वात महत्त्वाचा उपाय आहे मास्कचा वापर करणे.
रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या आणि गर्भधारणा नियोजन करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. गर्भधारणा झालेल्या अवस्थेत कोविड19 चे दुष्परिणाम जास्त होण्याचा धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला.
तसेच या आजाराविषयी भीती निर्माण करणाऱ्या बातम्या/लेख यापासून दूर राहा आणि पचण्यासाठी हलके असे घरचे अन्न घ्या असा सल्लाही त्यांनी दिला. ओमायक्रॉन व्हेरियंट बरोबरच युवा वर्गाच्या संसर्गात लक्षणीय वाढ झाल्याचे डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितले. कोविड19 महामारीचा युवा वयोगटातल्या लोकांवर परिणाम झाला तर सर्व साधारण प्रभाव सौम्य राहील हे आपण जाणतो कारण गंभीर आजारासाठी वय हा मोठा जोखमीचा घटक आहे, असे त्यांनी नमूद केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई यांनी महामारीविरोधात लढा देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांविषयी माहिती दिली. कोविड19 संदर्भात एका राज्यातल्या उत्तम पद्धतीचे इतर राज्यांनीही अनुकरण करावे, यासाठी इतर राज्यांसमवेत त्या सामायिक करत केंद्र सरकारने एकप्रकारे मध्यस्थाची भूमिका बजावली असे महासंचालक मनीष देसाई यांनी सांगितले. कोविड19 काळात, एम्स टेलिमेडिसीन यु ट्यूब चॅनेल म्हणजे उपयुक्त भांडार ठरले.
ऑनलाईन सल्ल्याची सुविधा पुरवणारे ई संजीवनी ओपीडी टेलिमेडिसीन पोर्टल यासारख्या स्तुत्य उपक्रमाद्वारे सुमारे 2.5 कोटी टेली कन्सलटेशन झाल्याची माहिती मनीष देसाई यांनी दिली.
पत्र सूचना कार्यालय, गोवा चे संयुक्त संचालक विनोद कुमार यांनी या वेबिनारचे आभार प्रदर्शन केले तर पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या माहिती अधिकारी श्रीयंका चॅटर्जी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
हा वेबिनार आपण येथे पाहू शकता