Training on ‘Farmers Producers to Agricultural Exporters’.
‘शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार’ विषयक प्रशिक्षणाचे आयोजन.
पुणे : ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेअंतर्गत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 1 हजार इच्छुक, पात्र शेतकऱ्यांना ‘शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार’ विषयक प्रशिक्षणाचे मराठा चेंम्बर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
मावळ तालुक्यासाठी 9 फेब्रुवारी, आंबेगाव 10 फेब्रुवारी, दौंड 16 फेब्रुवारी, इंदापूर 17 फेब्रुवारी, जुन्नर 23 फेब्रुवारी, पुरंदर 24 फेब्रुवारी , बारामती 2 मार्च, शिरुर 3 मार्च, मावळ 9 मार्च, दौंड 10 मार्च 2022 रोजी प्रशिक्षण राहील.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शेतमाल उत्पादनास निर्यात केल्याने निश्चितच त्यांना अधिकचा दर मिळून निव्वळ उत्पन्नात भर पडण्यास मदत होणार आहे. प्रति तालुका 50 निर्यातदार शेतकरी यांचे एक दिवसीय निर्यातदार प्रशिक्षण यानुसार एकूण 20 तुकड्यांमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन येणार आहे.
निर्यातदार युवक हा आत्मा अंतर्गत शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असावा. कमाल 40 वर्ष वयोमर्यादा, इयत्ता दहावी उत्तीर्ण, इंग्रजी वाचता लिहिता येणारा, व्यवसाय करण्याची इच्छा असणारा शेतकरी असावा. शेतकरी निवड निकषानुसार तालुक्याकरिता प्रति गाव एक इच्छुक, पात्र शेतकरी यानुषंगाने तालुक्यास प्राप्त लक्षाकानुसार शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
निर्यात संधी, ट्रेसेबिलिटी विविध नेट्स, विपणन आणि ब्रँडिंग, निर्यात प्रक्रिया आवश्यक कागदपत्र व प्रमाणीकरण, कृषी निर्यात अर्थ व्यवस्थापन व कृषी निर्यात योजना इत्यादी निर्यातदार प्रशिक्षणातील विषय असणार आहेत.
शेतकरी नोंदणी मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्व नोंदणी आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी देण्यात आलेल्या गुगल फॉर्मद्वारे (लिंक Google form link: https://forms.gle/KzwpByFAEowh7TnE7) माहिती भरावी आणि तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत पूर्व नोंदणी करुन प्रशिक्षण सत्रात सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे (020-25530431) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.