All restrictions in Mumbai are likely to be lifted by the end of the month as the number of corona patients is declining.
कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळं महिनाअखेरपर्यंत मुंबईतले सर्व निर्बंध हटवले जाण्याची शक्यता.
मुंबई: कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्यानं, कोरोनामुळे अनेक निर्बंधांमध्ये असलेली मुंबई फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत १०० टक्के अनलॉक होऊ शकते अशी शक्यता मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
सध्या सुरु असलेली कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्याचं चित्र आहे. मागच्या आठ दिवसामध्ये मुंबईतल्या दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येतही वेगानं घट झाली. त्यामुळे येत्या काळात निर्बंध शिथिल करण्याचा विचार आहे, फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत मुंबई १०० टक्के अनलॉक होऊ शकते असं ते म्हणाले. कोरोना प्रतिबंधाअंतर्गत सध्या मुंबईत केवळ एकच इमारत सील आहे अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोनामुळे मुंबईत लागू केलेले अनेक निर्बंध शिथील केले आहेत, सध्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स रात्री १० वाजता बंद करावी लागणं, तसंच लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी उपस्थितीवरची मर्यादा एवढेच निर्बंध लागू आहेत असं काकाणी यांनी स्पष्ट केलं.