The University of Mumbai will set up an Advanced Study and Research Center named after Lata Mangeshkar.
मुंबई विद्यापीठ लता मंगेशकर यांच्या नावानं प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना करणार.
मुंबई: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली म्हणून मुंबई विद्यापीठात ‘लता मंगेशकर सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’ या प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनं आज घेतला आहे.
त्याचबरोबर विद्यापीठाच्या संगीत विभागात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाचं अध्यासन स्थापन केलं जाणार असून लता मंगेशकर यांच्या नावाचं सुवर्ण पदक बहाल केलं जाणार आहे.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या सुगम संगीतावर अभ्यास आणि संशोधन व्हावं यासाठी या स्वयंअर्थसहाय्यित केंद्राची स्थापना केली जात आहे. या केंद्रांच्या माध्यमातून पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठी संशोधन केलं जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात स्थापन होणाऱ्या एक्सलेंस सेंटरमध्ये अद्ययावत स्डुडिओ, सांगितीक उपकरणं, सर्व प्रकारच्या तांत्रिक सोयी असतील. या ठिकाणी संगीत क्षेत्रातल्या अद्ययावत संशोधनाबरोबर परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय सुगम संगीत क्षेत्रातल्या संशोधनाची संधी उपलब्ध होणार असल्याचं मुंबई विद्यापीठानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.