The central government has not hidden the death toll.
केंद्र सरकारनं कोविड मृतांची संख्या लपवलेली नाही.
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं कोविड-१९ मुळे झालेल्या मृत्यूंची संख्या लपवलेली नाही असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. काल राज्यसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना
देशात आतापर्यंत ५ लाख ३३ हजार मृत्युंची नोंद झाली असल्याचं ते म्हणाले. कोविड प्रतिबंधक लसीकरणामुळे मृत्यूचं प्रमाण आणि रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत झाली आहे.
लसीकरणानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोविड प्रतिबंधक लस घेतलेले ९९ टक्क्यांहून अधिक नागरिक सुरक्षित राहिले असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासातून दिसून आलं असून कोविड लसीमुळे तयार होणाऱ्या एन्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडांमुळे हे शक्य झालं असल्याचं मांडवीय म्हणाले. १५ वर्षांखालील मुलांच्या लसीकराणाबद्द्ल वैज्ञानिक शिफारशींनुसार निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोनाचा ओमिक्रॉन हा प्रकार सध्या देशात प्रबळ आहे मात्र देशातील कोविड-१९ बाधितांची वाढ २१ जानेवारीपासून सातत्यानं घसरत असल्याचं दिसून येत आहे. कोविड-१९ विरुद्धची तयारी आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकार; राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत देत असून २३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. एकंदर ७२४५ कोटी रुपये राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्यामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यात मदत झाली असल्याचं मांडवीय म्हणाले.