Establishment of ‘Equal Opportunity Centers’ to guide students from backward classes.
मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी ‘समान संधी केंद्रां’ची स्थापना.
पुणे : महाविद्यालयात शिकणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना शिष्यवृत्ती फ्रीशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता, व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून संवाद अभियान, युवा संवाद कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे.
समाज कल्याण आयुक्तांच्या सूचनेनुसार प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक आणि सहाय्यक म्हणून काही विद्यार्थ्यांच्या मदतीने समान संधी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकार पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून राज्य सरकार उपाययोजना करणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासन प्रोत्साहीत करणार आहे. यासोबत रोजगार उद्योजक निर्मिती, उद्योजक किंवा व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींवर सर्वसमावेशक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि इतर सर्व शैक्षणिक संस्थांच्या सर्व महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत.
प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू नसले तरी प्रत्येक महाविद्यालयाने केंद्राची स्थापना करावी. समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करावा. समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांशी समन्वय साधण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.