Launch of ‘Iconic Week’ to accelerate Swachh Bharat and Jaljivan Abhiyan.
स्वच्छ भारत तसेच जलजीवन अभियानाची गती वाढवण्यासाठी ‘आयकॉनिक सप्ताह’ सुरू.
पुणे : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ व जलजीवन मिशन कामाची गती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेमार्फत ‘आयकॉनिक सप्ताह’
राबविण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
या सप्ताहामध्ये गावस्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या एमआयएस प्रणालीवर माहिती अद्ययावत करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांना गती देणे व वेळेत पूर्ण करणे या बाबींचा समावेश करण्यात आला आहेत.
सप्ताह कालावधीमध्ये ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व स्वच्छ पर्यावरण’ या विषयावर इयत्ता नववी ते बारावी मधील विद्यार्थ्यांची तर सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्यांची ‘शुद्ध पाणी व आरोग्य’ या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ‘गावामध्ये शुद्ध पाणी व स्वच्छता’ या विषयावर संवाद उपक्रमाचे आयोजन करून ग्राम पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
स्वच्छता समितीमध्ये ‘पाणी पट्टी व स्वच्छता’ या विषयावर चर्चासत्र घडवून आणण्याबाबत नियोजन करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासोबत स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत स्वच्छतादूत, जलदूत, स्वच्छताग्रही यांच्यामार्फत गावस्तरावरील स्वच्छता विषयक जनजागृती केली जाणार आहे असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी कळवले आहे.