The United States is committed to the security of the NATO region – Joe Biden
नाटो क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध- जो बायडेन
रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो आणि त्यासाठी कोणतंही आश्चर्यकारक कारण पुढे करू शकतो, मात्र कोणत्याही परिस्थितीत नाटो क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काल युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर ज़ेलेंस्की यांच्याशी चर्चा केली आणि रशियाच्या हल्ल्याला ताबडतोब आणि निर्णायक प्रत्युत्तर द्यायला अमेरिकेची तयारी असल्याचं सांगितलं.
रशियाच्या लष्करी सज्जतेला तोंड देण्यासाठी अमेरिका आणि युक्रेननं मुत्सद्देगिरी आणि निर्बंध यांचा पाठपुरावा करायला हवा, यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. दरम्यान शीतयुद्धानंतरची ही सर्वात स्फोटक परिस्थिती असून ती हाताळण्यात राजनैतिक प्रयत्न अयशस्वी होत असल्याचं चित्र असल्यामुळे पाश्चिमात्य देश युक्रेन मधल्या आपल्या नागरिकांना तातडीनं मायदेशी परतण्याचं आवाहन करत आहेत.
युक्रेनच्या सीमेवरचा वाढता तणाव पाहता युक्रेननं रशिया आणि प्रमुख युरोपियन सुरक्षा गटाच्या इतर सदस्यांची बैठक बोलावली आहे. सैन्याची उभारणी करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावं या विनंतीला रशियानं धुडकावून लावल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं. रशियाच्या योजनांबाबत पारदर्शकता यावी यासाठी पुन्हा एकदा रशियाला विनंती केली जाईल, असं ते म्हणाले. दरम्यान युक्रेनवर आक्रमण करण्याची कोणतीही योजना नाही, असा दावा रशियानं केला आहे.