Many investors prefer to invest in Maharashtra – Industry Minister Subhash Desai
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणुकदारांची पसंती -उद्योगमंत्री सुभाष देसाई
डॉ. सायरस पूनावाला यांचा विशेष गौरव
पुणे : महाराष्ट्र औद्योगिकरणात नेहमीचे अग्रेसर राज्य राहीले आहे. राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने राज्यात गुंतवणुक करण्यास अनेक गुंतवणुकदारांनी पसंती दर्शवली असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
पुणे येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत उद्योगमंत्री श्री.देसाई बोलत होते. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता, संचालक प्रशांत गिरबाणी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्राने कायम उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचे काम केले आहे. जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या राज्यामध्ये गुंतवणूक करत असून लॉकडाउननंतर राज्य सरकारने योग्य नियोजन करुन राज्याचे अर्थचक्र सुरू राहावे यासाठी काळजी घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना कालावधीत अनेक कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. कोरोना काळातही शंभर पेक्षा अधीक औद्योगिक करार झाले आहे. या माध्यमातून राज्यात अनेकांना रोजगार मिळाला आहे.
उद्योग क्षेत्राला पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, राज्यात उद्योग क्षेत्रात सहजता यावी यासाठी एक खिडकी योजनेत महापरवाना देण्याची योजना सुरू केली आहे. यामुळे उद्योग उभारणीचा परवाना मिळणे सुलभ झाले आहे. उद्योग क्षेत्रात या निर्णयामुळे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात असलेल्या शासकीय अभियांत्रिकी तसेच इतर कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होत असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात कोरोना संसर्गामुळे ऐकमेकांना भेटणे शक्य होत नव्हते. कोरोनाची पहिली लाट अत्यंत भयानक होती. मात्र सिरमच्या कोविशिल्ड लसीमुळे कोरोना संकटात मोठी साथ दिली आहे. उद्योग क्षेत्रात यामुळे आत्मविश्वास निर्माण केला आहे. डॉ. पुनावाला यांनी यासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वूपर्ण असल्याचेही श्री. देसाई म्हणाले.
डॉ. सायरस पूनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे जगभरातील अनेक देशांमध्ये काम सुरू असून कोविशिल्ड लशीच्या यशाबाबत माहिती दिली. यावेळी श्री. पुनावाला यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी उद्योग क्षेत्रातील विविध देशांचे प्रमुख उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.