मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा

BJP supports Chhatrapati Sambhaji Raje’s fast for the Maratha community,  Announcement made by Chandrakantdada Patil State President BJP

मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली घोषणा

Maratha-Aarakshan
File Photo

पुणे : मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी दि. २६ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले असून त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पुणे येथे पत्रकारांना सांगितले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जे ओबीसींना ते मराठा समाजाला असे सूत्र वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगाराच्या अनेक सवलती दिल्या तसेच आरक्षणही दिले. तथापि, महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गमावले तसेच मराठा समाजासाठी भाजपा सरकारने चालू केलेल्या योजनांची अंमलबजावणीही होत नाही. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरु केली, मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थींनींची निम्मी फी भरली व त्यासाठी ७८५ कोटी रुपये खर्च केले, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवक युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी दहा लाख रुपये कर्जाची योजना सुरू केली, मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतीगृहे सुरू केली. आज हे सर्व बंद आहे. त्यामुळे आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे किंवा राजे समरजितसिंह घाटगे अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.

ते म्हणाले की, मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टीने पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले तर त्याला राजकीय वळण येईल. त्यामुळे भाजपा असे आंदोलन करणाऱ्या मान्यवरांना पूर्ण समर्थन देईल.

जोशी भविष्य सांगतात पण पाटील कधी भविष्य सांगू लागले, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ते एका समाजाला हिणवणारे बोलत आहेत. त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे. हा जातीयवाद आहे व तो खूप महागात पडेल.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्कार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पुण्यात गुन्हे दाखल केले आहेत, त्याविषयी विचारले असता मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही पण ज्या पायरीवर सोमय्या यांना ढकलण्यात आले त्या पायरीवर त्यांचा सत्कार करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मात्र पोलीसांनी गुन्हा दाखल केला. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. भाजपा यामुळे घाबरणार नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *