Imitation of services starting from Mumbai all over the country – Chief Minister Uddhav Thackeray
मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ
ठाणे, दि.१७ (जिमाका): देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणेदरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बेलापूर जेट्टी आणि बेलापूर मुंबई वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा असून देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईतून सुरू झालेल्या सेवेचे अनुकरण देशभर केले जाते हे मुंबई ठाणे दरम्यानच्या पहिल्या रेल्वेसेवेरून दिसून आले आहे. जलवाहतुकीच्या या सेवेचेदेखील देशात अनुकरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईला मुंबईशी आणि एलिफंटा लेण्यांना जोडणारी ही जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर परिसराला जोडणारी जलवाहतूक सेवा महत्वाची आहे, कामासाठी, उद्योग व्यवसायासाठी मुंबई येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून महाराष्ट्रात १३१ प्रकल्प- केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल
केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल म्हणाले, सागर किनारपट्टी जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे. यातून सागरतटीय जिल्ह्यातील लोकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्नआहे. यातून रोजगार निर्मिती करून आर्थिक विकासाचे चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.कोरोना काळातही बेलापूर जेट्टीचे काम सुरु राहिले. नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या जलवाहतूक सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. आणखी काही जे्ट्टी मुंबई हार्बर भागात प्रस्तावित आहेत.
मुंबई ते अलिबाग रो रो सेवा सुरु झाली आहे. वॉटर टॅक्सीला मिळणारा प्रतिसाद पाहून जलवाहतूकीसाठी अतिरिक्त जेट्टीचे बांधकाम केले जाईल. केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, जेट्टीचे निर्माण, कौशल्य विकास अशा विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. सागरमाला कार्यक्रमातून जलद आर्थिक विकासाला चालना देण्यात येत आहे. १.०५ लाख कोटीचे १३१ प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत ४६ प्रकल्पास २७८ कोटीचे वित्तीय सहाय्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.