जैवसुरक्षा श्रेणी-3 (BSL-3) या पहिल्या फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण
नाशिक : सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म विषाणूपासून होणारे कोव्हीड सारखे इतरही संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM – ABHIM ) च्या अंतर्गत तयार केलेल्या जैवसुरक्षा श्रेणी-3 (BSL-3) या पहिल्या फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
जवळपास 25 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या या फिरत्या प्रयोगशाळेचे आज नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात लोकार्पण झाले. यावेळी आरोग्य संशोधन संचालनालयाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव, आरोग्य संशोधन संचालनालयाच्या सहसचिव अनु नागर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद -राष्ट्रीय विषाणू संस्था पुणेच्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम , एन आय व्ही पुणे येथील प्राणीजन्य आजार अध्यासनाचे प्रमुख डॉ देवेंद्र मौर्या आणि मुंबईतील क्लेंज़ाईड्स प्रतिबंधक क्षेत्र नियंत्रण या खाजगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरिष शहानी उपस्थित होते.
बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा हे आत्मनिर्भर भारताच्या निर्धाराचे उदाहरण आहे. कोविड काळातील विविध आव्हानांना तोंड देतानाच , भविष्यासाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि सुसज्ज यंत्रणा यंत्रणा तयार करण्यावर केंद्रसरकारने भर दिला असे त्यांनी आवर्जून सांगितले आणि सर्व केंद्रीय यंत्रणा दरदिवशी विविध राज्य सरकारशी संपर्क ठेवत या विषाणूच्या विविध रूपांचा कसा सामना करते याविषयी उपस्थिताना अवगत केले.
दक्षिण पूर्व आशियातील पहिली बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचे आभार मानले . आय सी एम आर-राष्ट्रीय विषाणू संस्था आणि क्लेंज़ाईड्स कंपनी यांनी एकत्रितपणे काम करत अत्यंत अत्याधुनिक अशी बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा, संपूर्ण भारतीय साहित्य वापरून केल्याबद्दल त्यांनी सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे कौतुक केले.
आय सी एम आर -एन आय व्ही च्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम म्हणाल्या की, अशा प्रकारची ही पहिली फिरती प्रयोगशाळा कुठल्याही संसर्गाचा सामना करण्यासाठी, त्याचे त्वरित निदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा त्यांना विश्वास आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा (PM-ABHIM) भाग म्हणून आरोग्य संशोधन संचालनालय आणि भारतीय वैद्यकीय परिषद (ICMR) यांनी एक स्वदेशी बनावटीची बायोसेफ्टी श्रेणी-3 ची प्रतिबंधक क्षेत्रासाठी खास बनवून घेतली आहे. या प्रयोगशाळेच्या मदतीने, नव्याने येणाऱ्या, आणि पुनःपुन्हा येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा शोध घेता येईल.
या प्रयोगशाळेमुळे देशाच्या दुर्गम आणि सुदूर भागात जाता येईल जिथे आयसीएमआरचे – एनआयव्ही, आरएमआरसी – गोरखपूर या सारखे आयसीएमआरचे विशेष प्रशिक्षित वैज्ञानिक मनुष्य आणि प्राण्यांच्या नमुन्यांची चाचणी करून महामारीच्या उद्रेकाचा शोध घेऊ शकतील.