The Birth Anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj Celebrated across the country today
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
रयतेचा राजा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती आज देशात सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. शिव जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी देशबांधवांना शुभेच्छा देऊन शिवरायांना अभिवादन केलं आहे. शिवरायांनी आपल्या अप्रतिम शौर्यानं आणि युद्ध कौशल्यानं भारताची राष्ट्र भावना चेतवली असून महाराजांचा राष्ट्रवाद आजही अनुकरणीय आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी शिवरायांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
संसद भवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला शहाजी राजे छत्रपती, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्कवरच्या शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा शासकीय निवासस्थानी महाराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं .महाराजांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार आणि रणनीती प्रेरणादायी आहे. शिवछत्रपतींची शिकवण डोळ्यासमोर ठेऊन आमचे सरकार काम करीत आहे आणि पुढे देखील करत राहील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते असं उपमुख्यमंत्री म्हणाले. महाराजांचं जीवन आणि महान कार्याचा नव्या पिढीला परिचय करून देण्यासाठी शासन गड किल्ल्यांचा विकास करत आहे असं पवार यावेळी म्हणाले.
गेट वे ऑफ इंडिया इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज नांदेड इथे पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड इथं छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अमरावतीमध्ये छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शाळकरी मुलांनी आणि शिक्षकांनी ५० फुटाची इको-फ्रेंडली तलवारीवर महाराजांचे किल्ले, शिवमुद्रा, महाराजांचा टोप, मा जिजाऊ, चंद्रकोर अशी शिवसृष्टी निर्माण करून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्यात एका तरुणीनं रांगोळीतून शिवाजी महाराजांची पाच हजार स्वेअरफुटाची प्रतिमा साकारली. बी फार्मसीची विद्यार्थी असलेल्या वैष्णवी पाटीले हिने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तब्बल 96 तासांच्या मेहनतीनंतर ही प्रतिमा साकारली.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकात नूतनीकरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झालं. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड उपस्थित होते. शिवछत्रपतींचं हे देशातलं सर्वाधिक उंचीचं शिल्प आहे.