Inauguration of the first Divyang Snehi Samvedana Udyan in Thane
राज्यातल्या पहिल्या दिव्यांग स्नेही संवेदना उद्यानाचं ठाण्यात उद्घाटन
ठाणे : राज्यातल्या पहिल्या दिव्यांग स्नेही संवेदना उद्यानाचं उद्दघाटन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्याहस्ते आज झालं.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नौपाडा इथल्या या दिव्यांग स्नेही उद्यानात दिव्यांगासाठी विविध कल्पना राबवल्या आहेत. पूर्णपणे अडथळे मुक्त ब्रेललिपीमधल्या सूचनादेखील उपलब्ध आहेत. इथं एक संवेदी विभाग देखील आहे. जिथे दिव्यांग व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी गंध, आवाज, स्पर्श आणि चव यासारख्या जन्मजात संवेदी क्षमतांचा वापर करु शकतात.
सुगंधी वनस्पतींनीयुक्त स्वतंत्र विभाग, सुरक्षित स्पर्शासाठी काटे नसलेल्या वनस्पती अशी अनेक वैशिष्टये इथल्या वनस्पती विभागात आहेत.
दृष्टीहीनांसाठी एक संवेदी ट्रॅक देखील आहे. उद्यानाच्या आतले रस्ते अॅक्यूपेशर टाईल्सनं सुसज्ज आहेत. खुल्या व्यायाम शाळेसोबतच इथं पियानोसारख्या खुल्या वाद्यमेळांचा एक संच देखील आहे.
दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी समुपदेशन करण्याकरता स्वतंत्र जागा, जागतिक पटलावर प्रसिद्ध दिव्यांग वीरांबद्दल माहिती देणारी चित्र, आणि संक्षिप्त जीवनचरित्र भितारलेली एक भिंत असलेला हॉल ऑफ फेम या उद्यानाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे.
हे उद्यान ठाण्यातल्या दिव्यांग मंडळींना सर्मपित असलं तरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्याचं लोकार्पण होत असल्यानं ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या महान स्वातंत्र्यसैनिक अनंत कान्हेरे यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मराणार्थ एक विशेष विभागदेखील इथं उभारला आहे.