Organization of MP Industry Festival in Nagpur from 12th to 14th March
१२ ते १४ मार्च कालावधीत नागपुरात खासदार उद्योग महोत्सवाचे आयोजन
नागपूर : येत्या १२ ते १४ मार्च या कालावधीत नागपुरात ३ दिवसीय खासदार उद्योग महोत्सव आयोजित केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली डॉ. पी.एम.पार्लेवार, एमएसएमई- विकास संस्था, नागपूर यांच्यावतीनं हा ३ दिवसीय महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाच्या बॅनरचे अनावरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.
मेगा नॅशनल इंडस्ट्रियल एक्स्पो हे या खासदार औद्योगिक महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असेल. मोठे उद्योग, केंद्र आणि राज्य सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, कॉर्पोरेट्स, एमएसएमई, स्टार्ट अप्स, आयटी-आयटीईएस, वित्त, संशोधन आणि शैक्षणिक संस्था या एक्स्पोमध्ये सहभागी होतील.
या कार्यक्रमा दरम्यान उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या विविध पैलूंवर आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, क्लस्टर डेव्हलपमेंट, व्हेंडर डेव्हलपमेंट आणि खरेदीदार-विक्रेता संमेलन, निर्यात प्रोत्साहन आणि आयात स्वदेशीकरण, लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्र यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण दिलं जाईल.
इनोव्हेशन आणि स्टार्टअप्स, वाहन क्षेत्र, कृषी आणि अन्न प्रक्रिया, ऊर्जा क्षेत्र, संरक्षण खरेदी, पत सुविधा, तत्रज्ञान हस्तांतरण, प्लॅस्टिक प्रिंटिंग आणि पॅकेजिंग सेक्टर, पर्यटन इत्यादी विषयावर परिषदा होतील.
एमएसएमई मंत्रालयाच्या योजनेनुसार सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी स्टॉल-भाड्यावर अनुदान उपलब्ध आहे, अनुसुचित जाती जमाती महिला उद्योजकांसाठी १०० टक्के आणि सामान्य श्रेणीतल्या उद्योजकांसाठी ८० टक्के सवलत मिळणार आहे.