Telangana CM K. Chandrasekhar Rao discusses with Uddhav Thackeray and Sharad Pawar in Mumbai today
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. देशात परिवर्तनाची गरज असून अवैध कामांविरोधात लोकशाहीच्या मार्गानं लढा देण्याच्या मुद्द्यावर यावेळी सहमती झाल्याचं राव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
देशाची प्रगती, आर्थिक सुधारणा, विकासाची गती वाढवणं आणि धोरण बदल यासारख्या अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांसह चर्चा झाली आणि बहुतांश विषयावर सहमती झाल्याचं ते म्हणाले. देशातल्या केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर सुरू आहे. वातावरण खराब करण्याचे प्रयत्न होत आहे. या सर्वांशी लोकशाही मार्गाने लढा देणार असून देशातल्या अन्य नेत्यांशीही यामुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विकास, गरीबी, बेरोजगारीच्या मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. देशासमोरच्या विविध समस्यांवर आणि तोडग्यावर यावेळी चर्चा झाली, असं पवार यांनी सांगितलं.
देशातलं सुडाचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलं असून ही आपल्या देशाची परंपरा नाही. देशातल्या मुलभूत प्रश्नांकडे सध्या दुर्लक्ष होतंय. त्यामुळं देशाच्या भविष्याचा एकत्र विचार करण्यासाठी आणि नव्या विचारांची सुरुवात म्हणून आजची बैठक होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.