Ministry of External Affairs should work in ‘mission mode’ to provide excellent service to the people – Governor Bhagat Singh Koshyar
जनसामान्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ‘मिशन मोडने’ काम करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : परराष्ट्र व्यवहार देशाकरिता अतिशय महत्वाचा विभाग असून करोनाच्या कठीण काळात या विभागाने अतिशय कुशलतेने काम केले. सध्या युक्रेन येथे उद्भवलेल्या परिस्थितीत देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारतीय लोकांना सुरक्षित आणण्यासाठी चांगले काम करीत आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कार्यामुळे देशाची प्रतिमा तयार होते असे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने नागरिक तसेच देशात येणाऱ्या पाहुण्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाच्या मुंबईतील विभागीय पारपत्र कार्यालय, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, प्रवासी संरक्षक विभाग तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय शाखा सचिवालयातर्फे एक आठवड्याच्या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सांगता व बक्षीस समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे आज रविवारी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबई येथे अनेक राष्ट्रप्रमुख, विदेशातील प्रांतीय मुख्यमंत्री, संसद सदस्य, राजदूत व उद्योजक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे मुंबईतील परराष्ट्र मंत्रालय विभाग दिल्लीपेक्षाही अधिक सक्रिय आहे, असे सांगून परराष्ट्र मंत्रालयातील लोक किती तत्परतेने आणि लोकाभिमुखतेने काम करतात यावर देखील देशाच्या परराष्ट्र नीतीचे यश अवलंबून असते असे राज्यपालांनी सांगितले.
सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना सामान्य नागरिकांना त्वरित प्रतिसाद देणारी प्रणाली विकसित केली होती असे सांगून या प्रणालीच्याही पुढे जाऊन परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सौजन्यपूर्ण सेवा दिली तर तो विभाग आदर्श विभाग म्हणून प्रस्थापित होईल असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच काव्य संमेलनातील सहभागी कवींचा सत्कार करण्यात आला.