Development of rural areas only if forest resources are protected – Mahajan
वनसंपदा जपली तरच ग्रामीण भागाचा विकास – महाजन
पुणे : आपल्या देशातील वनसंपदा जगाच्या अन्य देशांच्या तुलनेत अत्यंत उपयुक्त असून देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासात भर घालणारी आहे, त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र संशोधक प्रा. श्री. द. महाजन यांनी आज येथे केले.
भांडारकर संस्था प्रकाशित “आपली वनसंपदा” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुस्तकाचे अनुवादक श्रीराम गोमरकर, संपादिका नीलिमा रड्डी, मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखडे, माजी वन अधिकारी विश्वास सावरकर, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया आणि भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन उपस्थित होते.
वनराई संस्थेने २०१४ साली वरिष्ठ वनाधिकारी स्व. डॉ. अरविंद रड्डी यांचे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित केले होते, त्याच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन आज करण्यात आले.
यावेळी बोलताना गोमरकर म्हणाले की, स्व. रड्डी यांनी आपले संपूर्ण आयुष्य अरण्य, वने, वन्यजीव यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या संशोधन वृत्तीने नवनवीन माहिती मिळाली, जी या पुस्तकातून मिळते. त्यांनी ग्रामीण विकासाचे आदर्श आराखडे देखील तयार केले होते.
यावेळी धारिया म्हणाले की, या पुस्तकातून जंगले आणि वन्यजीव यांची इत्यंभूत माहिती मिळते, ज्याचा सामाजिक संस्थांना खूप उपयोग होऊ शकतो. यावेळी भूपाल पटवर्धन म्हणाले की, वन्यजीवन सर्वांपर्यंत पोहचावे या हेतूने आम्ही हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
भूतकाळातील अनेक चांगल्या गोष्टी वर्तमानात राबवल्या तरच भविष्यकाळ उज्ज्वल होऊ शकतो. नीलिमा रड्डी यांनी स्व. अरविंद रड्डी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
उपस्थितांचे आभार श्रीरंग रड्डी यांनी मानले तर प्रिया भिडे यांनी सूत्रसंचालन केले.