Adolescents need vaccinations; Covid-19 vaccine safe
किशोरवयीन वयोगटाचे लसीकरण गरजेचे; कोविड-19 ची लस सुरक्षित
किशोरवयीन वयोगट आणि कोविड19 लसीकरण’ या विषयावरील पत्र सूचना कार्यालयाच्या वेबीनार मध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केले मत
मुंबई : कदाचित आपण कोरोना महामारीच्या अंतिम टप्प्यात आहोत, मात्र लोकांनी प्रतिबंधक लस न घेतल्यास, विषाणू हल्ला करू शकतो; तसेच उत्परिवर्तन होण्याची व रोगप्रतिकारक यंत्रणेपासून बचाव करण्याची संधी या विषाणूला मिळू शकते, ज्यामुळे चौथी लाट येऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. मृदुला फडके, वरिष्ठ सल्लागार, महाराष्ट्र शासन व युनिसेफ बालआरोग्य यांनी आज केले.
लसीकरण केले नसले तरीही मुलांसाठी शाळेत जाणे सुरक्षित आहे. आपण आता कोविड19 कमी होण्याच्या टप्प्यात आहोत; तरी ‘एसएमएस’चे पालन केले पाहिजे- शारीरिक अंतर, मास्क घालणे, नियमित हात धुणे, हे झाले पाहिजे. शाळा उघडल्याने होणारे फायदे हे शाळेत जाण्याच्या जोखमीपेक्षा जास्त आहेत असे फडके यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले
18 वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना लस दिल्यानंतर वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देणे सुरू झाले. आता मार्च नंतर 12 वर्षावरील मुलामुलींना देखील लस दिली जाण्याची तयारीकेली जात असून . यातही सहव्याधी असणाऱ्या, जोखमीच्या मुलांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती प्रा. प्रवीण कुमार, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज, दिल्ली यांनी या वेबीनारच्या माध्यमातून दिली. प्रा. प्रवीण कुमार देखील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.
लशीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतर किमान सहा महिन्यासाठी मुलांना संरक्षण मिळणार आहे. कदाचित आठ ते तेरा महीने सुद्धा हे संरक्षण टिकून राहिल. त्यामुळे नि:शंक मनाने लस घ्यावी असे आवाहन डॉ. फडके यांनी केले.
लस दिल्यानंतर ताबडतोब प्रतिकरशक्ती तयार होत नसते. त्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. कोविड होणे , रुग्णालयात दाखल व्हावे लागणे व मृत्यू या तीन गोष्टींविरुद्ध लस मदत करणार आहे. आजारापासून लसीकरण 80 टक्के सुरक्षा देईल, पण मृत्यू व रुग्णालयापासून 90-95 टक्के प्रतिबंध होणार आहे. मुलांचे लसीकरण करून आपण केवळ त्यांचेच नाही तर कुटुंबाचे आणि त्याद्वारे समाजाचेही रक्षण करत आहोत आणि COVAXIN ही मुलांसाठी चांगली लस आहे, असे सांगून डॉ. मृदुला फडके यांनी, पालकांनी पुढे येऊन आपल्या किशोरवयीन मुलांना लसीकरण करण्याचे आवाहन केले.
याशिवाय मुलांना आत्तातरी बुस्टर डोसची आवश्यकता नाही, कारण नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे. पहिले दोन डोस झाल्यानंतरच त्यासाठी विचार करणे शक्य होईल. लस घेतल्यानंतर देखील मास्क लावणे, हात निर्जंतुक करणे, शारीरिक अंतर ठेवणे या गोष्टी करत रहा, असे आवाहन प्रा. प्रवीण कुमार यांनी केले.