शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार; प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना जाहीर

Sharad Sports and Cultural Foundation’s Ram Kadam Kala Gaurav Puraskar announcement to Famous singers Shankar Mahadevan and Rahul Deshpande

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार; प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना जाहीर

10 मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव

पुणे : रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 13वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार ब्रेथलेस गायनामुळे प्रसिद्धीस आलेले लोकप्रिय गायक व संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन आणिRam Kadam Kala Gaurav Puraskar कै. वसंतराव देशपांडे यांचा वारसा समृद्ध करणारे युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना दिला जाणार असून पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे निमंत्रक व संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. 10 मार्च 2022 रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील असणार आहेत. ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, सुहाना-प्रवीण मसाला उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडीया यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त स्व. राम कदम यांनी संगीत दिलेल्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम सायंकाळी 5:00 वाजता होणार असून पुरस्कार वितरण सायंकाळी 6:00 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास स्व. राम कदम यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

मराठी चित्रपट गीतांचे जादूगार आणि लावणी गीतांचे शहेनशहा मानल्या जाणार्‍या श्रेष्ठ संगीतकार राम कदम यांच्या नावाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 2006 पासून राम कदम कलागौरव पुरस्काराने संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. यात जगदीश खेबुडकर, भास्कर चंदावरकर, इनॉक डॅनियल्स, सुलोचना चव्हाण, चंद्रशेखर गाडगीळ, अजय-अतुल गोगावले, उषा मंगेशकर, अशोक पत्की, सुरेश वाडकर, यशवंत देव, अरुण दाते, अनुराधा पौडवाल यांचा समावेश आहे.

शरद पवार यांच्या सूचनेनुसार या वर्षीपासून हा पुरस्कार दोन कलावंतांना देण्यात येणार आहे, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले. प्रतिष्ठानचा 2022चा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार विवेक थिटे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी होणार्‍या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात कार्तिकी गायकवाड, सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, सावनी सावरकर आणि ऐवंत सुराणा गीते सादर करणार आहेत. सचिन इंगळे, राजू दूरकर, समीर शिवगार, केदार मोरे, अर्शद अहमद, राजा साळुंके, अभय इंगळे, अमृता केदार, निलेश देशपांडे साथसंगत करणार असून निवेदन रवींद्र खरे यांचे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *