The results of the Assembly elections in five states will determine the direction of the 2024 Lok Sabha elections – Prime Minister
पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानं २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची दिशा निश्चित – प्रधानमंत्री
नवी दिल्ली: पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानं २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची दिशा निश्चित केली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं पक्ष कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
भाजपाची गरिबांच्या हिताची धोरणं आणि सुशासनावर या निकालानं शिक्कामोर्तब केला आहे, असं ते म्हणाले. उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये सत्तेत असूनही भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे.
गोव्यात भाजपा सर्वात मोठा एकमेव पक्ष ठरला आहे तर उत्तराखंडमध्ये भाजपानं इतिहास घडवला आहे. उत्तरप्रदेशांन देशाला अनेक प्रधानमंत्री दिले मात्र गेल्या ३७ वर्षात कोणत्याही सरकारला पहिला कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा लगेच सत्ता मिळाली नव्हती. यावेळी उत्तरप्रदेशानं पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिली आहे.
सरकारनं केवळ शासनप्रणालीत सुधारणा केल्या नाहीत तर यासंपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली. प्रत्येक गरजूपर्यंत सरकारी सुविधा पोचतील याची खात्री भाजपानं गरिबांना दिली. त्यामुळे हे यश मिळालं आहे, असं मोदी म्हणाले.