Savitribai Phule Pune University now has a caricature museum ..!
सावित्राईबाई फुले पुणे विद्यापीठात आता व्यंगचित्रकला संग्रहालयही..!
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरज ‘एसके’ श्रीराम यांच्या हस्ते उदघाटन
पुणे दि,१२ – भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी काढलेल्या चित्राबरोबरच भारतात इस्ट इंडिया कंपनीची सुरवात आणि त्यानंतरच्या ब्रिटिश राजवटीपासून ते आतापर्यंत एकूणच सामाजिक राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी अनेक दुर्मिळ व्यंगचित्र पाहण्याची संधी आता नागरिकांना उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरज ‘एसके’ श्रीराम यांच्या हस्ते व्यंगचित्रकला संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले.
व्यंगचित्रकलेचा जवळपास अडीचशे वर्षापासूनच इतिहास या व्यंगचित्रकला संग्रहालयाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हे केवळ व्यंगचित्रांचे प्रदर्शन नसून हा एक प्रयोग आम्ही करत आहोत ज्या माध्यमातून भविष्यात या विषयीचे अभ्यासक्रम, संशोधन तसेच प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळेल याचा विचार आम्ही करत आहोत.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
या उदघाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज विभागाच्या प्रमुख डॉ.माधवी रेड्डी, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुरज ‘एसके’ श्रीराम म्हणाले, विद्यापीठाच्या माध्यमातून व्यंगचित्रकला अधिकाधिक कलाप्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत हॊईल तसेच पुढील काळात युवा कलाकारांना यातून संशोधनासाठी आणि कला प्रदर्शनासाठी व्यासपीठही उपलब्ध होईल. या कलादालनात केवळ व्यंगचित्र नाही तर व्यंगचित्रकलेविषयी माहिती देणारी अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासासाठी होईल.