Inauguration of Rice Festival by Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन
शेतमालाचे उच्च दर्जाचे अधिक उत्पादन काढा – अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते शिवाजीनगर येथे कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत आयोजित तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन झाले. तांदूळ आणि इतर कृषीमाल विक्रीच्या स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत शेती परवडण्यासाठी उच्च दर्जाचे आणि अधिक उत्पादन काढा असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
साखर संकुलाशेजारी कृषी भवन इमारतीच्या पाठीमागे या तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास श्री. पवार यांनी भेट देऊन प्रत्येक स्टॉलधारक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तांदळाचे एकरी उत्पादन किती निघते असे एका शेतकऱ्याला प्रश्न विचारत असता कमी उत्पादन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी केवळ वेगळ्या वाणाचे चांगल्या प्रतीचे उच्च दर्जाचे कृषी उत्पादन असून चालणार नाही तर दर्जासोबत उत्पादनही जास्तीत जास्त पाहिजे, त्याशिवाय शेती परवडणार नाही असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांना सांगितले. सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनवाढीसाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक स्टॉलवरील तांदूळ आणि इतर धान्ये, कडधान्ये आदींच्या दराची त्यांनी विचारणा केली. तसेच विविध प्रकारच्या तांदळातील दरात असलेल्या तफावतीची माहिती घेतली. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या इंद्रायणी, आंबेमोहोर तांदूळ, काळा, लाल, निळा तांदूळ या वाणांना तीनशे- साडेतीनशे रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे समजल्यावर ही शेतकऱ्यांसाठी चांगली बाब असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी, आदिवासी भाग, दुर्गम गावातील महिला तसेच पुरुष शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषीमाल, मध, नाचणी, हळद, गूळ आदींशिवाय गीर, साहिवाल गाईच्या दुधापासून बनवलेले तूप अशा पशुउत्पादनांबाबत श्री. पवार यांनी माहिती घेतली. त्यांनी यावेळी सेंद्रीय गुळाची चव चाखली तसेच प्रशंसा केली. एका स्टॉलवरील विक्रीसाठी ठेवलेली हळद पावडर दर्जेदार असल्याचे सांगून गटाने छोटा हळद प्रक्रिया उद्योग सुरू करावा त्यासाठी आवश्यक ती मदत करू असे सांगितले. राज्यात सांगली आणि हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होते. त्यावर अधिक संशोधन होण्यासाठी गडहिंग्लज येथे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
एका स्टॉलला भेट देत असता तेथील शेतकऱ्याने भाताच्या पिकाला शाळेतील मुलाने पाणी दिले असे सांगून उपमुख्यमंत्री यांच्यासमोर आनंद व्यक्त केला. परंतु श्री. पवार म्हणाले की, आधी शाळा व्यवस्थित पूर्ण कर. त्यानंतर शेती कर किंवा आणखीन काही कर. तोपर्यंत वडील, चुलते शेती करतील त्याची काळजी करू नको, असे त्याला उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.