Government is positive about the proposal to create an additional tehsildar office at Loni Kalbhor – Revenue Minister Balasaheb Thorat
लोणी काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय निर्मिती प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत सदस्य ॲड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरिकीकरण, विकास पाहता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्यासंदर्भात लक्षवेधी मांडली.
या लक्षवेधीस उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी –चिंचवड येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार मूळ हवेली कार्यालय व अपर तहसिल कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरू आहे.
लोणी-काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही महसूल मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.