Organizing an online lecture series on Maratha history
मराठा इतिहासावरील ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन
पुणे : भारत इतिहास संशोधक मंडळ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरयांच्या संयुक्त विद्यमाने मराठा इतिहासावरील एक परिचयात्मक ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून स्वराज्य ते साम्राज्यापर्यंतचा काळ ज्येष्ठ इतिहास संशोधक मांडणार असल्याची माहिती भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आज येथे सांगितले.
माजी खासदार प्रदीप रावत, उदय कुलकर्णी, पांडुरंग बलकवडे, निवृत्तमेजर जनरल शशिकांत पित्रे, केदार फाळके वक्ते असून सदरच्या व्याख्यानमालेमध्ये भारताची शिवपूर्व काळातील राजकीय पार्श्वभूमी,स्वराज्याची स्थापना, साम्राज्य विस्तार आणि वेळोवेळी आलेली आव्हाने या व अशा अनेक मुद्द्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल.
सशुल्क असलेली ही ऑनलाईन व्याख्यानमाला २१ मार्च ते २ एप्रिल २०२२ या कालावधीत (रविवार सोडून) होणार असून एकूण बारा व्याख्याने दररोज सायं. ७ ते ८.३० या वेळेत होणार आहेत. व्याख्यानाची रेकोर्डेड लिंक ७ दिवस बघण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी ९६७३३३७९०१ या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.