Rs 39 crore was distributed as per instructions of Finance Minister Ajit Pawar for the reconstruction and rehabilitation of ST Corporation buses.
एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी, पुन:स्थितीकरणासाठी वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ३९ कोटी रुपये वितरित
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थीनींना गाव-शाळेदरम्यान वाहतूक सुविधा देण्यासाठी निधी
मुंबई :- एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार 39 कोटी रुपये आज महामंडळाला वितरित करण्यात आले असून या निधीतून एसटीच्या 300 बसगाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थीनींना बारावीपर्यंत शिक्षणासाठी गाव ते शाळेदरम्यान वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते, त्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व मुलींना गाव ते शाळेपर्यंत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. विद्यार्थींनींना वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्याची ही योजना नियमितपणे राबविण्यासाठी वर्ष 2011 ते 2013 या कालावधीत प्रत्येक तालुक्याला 5 याप्रमाणे 125 तालुक्यांना 625 बसगाड्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
त्यानंतर टप्प्याटप्याने 247 अतिरिक्त बसगाड्या खरेदी करण्यात आल्या. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत महामंडळातर्फे 872 बसगाड्या चालवण्यात येतात. महामंडळाला वर्ष 2011 ते 2013 या कालावधीत टप्प्याटप्प्याने प्राप्त झालेल्या व ॲल्युमिनियम धातूत बांधलेल्या 625 बसगाड्यांपैकी ज्यांची ‘बॉडी’ (बांधणी) नादुरुस्त स्थितीत आहे अशा 300 वाहनांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरण करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत प्रतीवाहन 13 लाख रुपये खर्च करुन बसगाड्यांच्या पुन:स्थितीकरणाचे काम करण्यात येणार आहे. राज्य शासनाने 39 कोटी रुपयांचा निधी वितरीत केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष करुन विद्यार्थीनींचा एसटी प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
Hadapsar News Bureau