Bhumi Pujan of ‘Marathi Bhasha Bhavan’ on the auspicious occasion of Gudipadva by Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे.
जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र दक्षिण मुंबई परिसरात आणि उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे.
मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीकरिता गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंड विनामोबदला मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय झाला आहे.
सुमारे 2100 चौ.मी. क्षेत्र मराठी भाषा भवनास मिळणार आहे. अंदाजे 126 कोटी रुपये एवढा खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे. मुंबईच्या मे. पी.के. दास ॲण्ड असोसिएट्स यांची वास्तू विशारद म्हणून निवड करण्यात आली आहे.
Hadapsar News Bureau