Prabodhan Goregaon Sanstha has started the work of keeping Marathi people together – CM Uddhav Thackeray
प्रबोधन गोरेगाव संस्थेकडून मराठी माणसाला एकत्र ठेवण्याचे काम समर्थपणे सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रबोधन गोरेगाव या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता सोहळा
मुंबई : एखादी संस्था स्थापन करणे, ती उभी करणे सोपे असते पण ती सातत्याने कार्यरत ठेवणे खूप अवघड काम आहे आणि हेच अवघड काम प्रबोधन गोरेगाव ही संस्था समर्थपणे करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मागील ५० वर्षे कला, क्रीडा, संस्कृती व आरोग्य या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रबोधन गोरेगाव या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.
प्रबोधन गोरेगाव ही संस्था ५० वर्षांनंतर तेवढ्याच हिमतीने व दिमाखात सुरु आहे. मराठी माणसाला एकत्र ठेवणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे आणि तेच काम ही संस्था समर्थपणे करत आहे. याचे संपूर्ण श्रेय मराठी भाषा मंत्री आणि संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई यांना जाते. श्री. देसाई यांनी अथकपणे काळानुरुप या संस्थेत सुधारणा केल्या.
बाळासाहेबांचे ब्रीदवाक्य ८०℅ समाजकारण व २०% राजकारण श्री. देसाई यांनी सार्थ ठरवले आहे. फक्त नेतेगिरी करुन कुणीही मोठा नेता होत नाही, तर कार्यकर्त्यांना मोठं करणारे, त्यांच्यासमोर आपला आदर्श ठेवणारे खरे नेते असतात, हेच श्री. देसाईंनी संस्थेच्या कार्यातून दाखवले आहे. स्वातंत्र्याचे पावित्र्य जपणाऱ्या प्रबोधन या संस्थेचे कार्य ५० वर्षेच नाही तर पुढील अनेक वर्षे असेच अविरत सुरू राहावे, हीच त्यांना शुभेच्छा.
५० वर्षांपूर्वीच्या “प्रबोधन गोरेगाव” चा आज वटवृक्ष झाला – शरद पवार
५० वर्षांपूर्वी छोटेसे रोपटे लावलेल्या आणि गोरेगांवकरांशी समरस असलेल्या प्रबोधन गोरेगाव या एका चांगल्या संस्थेचा वटवृक्ष झाला असल्याचे गौरवोद्गार खासदार श्री. शरद पवार यांनी आज गोरेगावात काढले.
संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता शुक्रवार दि. १ रोजी त्यांच्या हस्ते झाली. यावेळी श्री. पवार यांनी संस्थेचे संस्थापक व राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव केला. यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते प्रबोधनाची पन्नाशी या कॉफीबुक टेबलचे आणि या संस्थेच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीच्या चित्रफितीचे उद्घाटन झाले.
Hadapsar News Bureau