Rajya Sabha proceedings stalled due to mutiny by opposition parties against fuel price hike
इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब
नवी दिल्ली : इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. सकाळी सदनाचं कामकाज सुरु होताच ते, स्थगित करण्याची काँग्रेस, तृणमूल, डावे आणि द्रमुकच्या सदस्यांनी केलेली मागणी अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली. सभासदांना वित्त विधेयकावर चर्चा करण्याची संधी असून, ते इंधन दरवाढीच्या विषयावर चर्चा घडवू शकतात, असं नायडू यांनी सांगितलं.
त्यावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब झालं. दुपारी दोननंतर जेव्हा सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरु झालं, तेव्हा विरोधी पक्षांनी गदारोळ सुरु ठेवला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. तत्पूर्वी आसाम, केरळ आणि नागालँडमधून निवडून आलेल्या सहा नवीन राज्यसभा सभासदांनी शपथ घेतली.
दरम्यान गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यातून ५० लाख बॅरल कच्चं तेल उपलब्ध करून द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. हा साठा उपलब्ध करून देताना भारतानं अमेरिकेसह इतर प्रमुख ग्राहक देशांशी सल्लामसलत केल्याचं पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं.