Complete the work of removing radaroda and cleaning the streets by May 31 – Chief Minister Uddhav Thackeray’s instructions
राडारोडा काढण्याची आणि नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा
मुंबई : येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भवणार नाही, यासाठी महानगरातील सर्व राडारोडा (डेब्रिज) काढण्याची कामे आणि नालेसफाईची कामे सर्व संबंधित यंत्रणांनी ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मुंबई महानगरातील पावसाळापूर्व कामांचा विशेषतः राडारोडा (डेब्रिज) व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक घेण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबई महानगरात पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीए, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पोलीस या विविध विभागांनी कामांना गती द्यावी.
मुंबई महानगरात राडारोडा (डेब्रिज) तयार होण्याच्या ४५० जागा असून ३१ मे पर्यंत हे डेब्रिज साफ करण्याची कार्यवाही एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.
कांदिवली भागात मेट्रोची जी कामे सुरु आहेत, त्याठिकाणी अर्धवट राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यात यावे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गामधील ४७ कल्व्हर्ट तसेच मुंबई महानगरातील रेल्वे ट्रॅकवरील ४० कल्व्हर्ट स्वच्छ करुन घेण्याची कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाला दिले.
डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर विशेष भर द्यावा, असे सांगून ज्या भागांमध्ये मेट्रोसह इतर सार्वजनिक कामे सुरु असतील त्या भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेऊन डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी संबंधित कंत्राटदारांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
संभाव्य वादळ, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता उंच इमारतींवर बांधकामासाठी लावण्यात आलेल्या क्रेन्समुळे दुर्घटना घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी संबंधित विकासकांना सूचना द्याव्यात असे सांगून अतिवृष्टीच्या काळात किनारपट्टी भाग, कोळीवाड्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास त्यासाठी अगोदरच सुविधा उपलब्ध करुन ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
मुंबईत पावसाळापूर्व कामांसाठी विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचे आणि सुरु असलेल्या कामांचे महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी सादरीकरण केले.
Hadapsar News Bureau