कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी

Kopargaon rural police station and police colony sanctioned, Rs 25 crore to be provided – Deputy Chief Minister Ajit Pawar

कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी, २५ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

एक हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

शिर्डी  : कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी दिली असून त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज कोपरगाव येथे केली.

कोपरगाव येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर या इमारतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार म्हणाले, मागील दोन वर्षाच्या काळातील कोरोना संकटावर सर्वांच्या सहकार्याने मात केली असून, कोरोना संकट पुन्हा येऊ नये यासाठी शासन जागरुक आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीसाठी सुमारे 1 लाख 25 हजार कोटी रुपये तरतुदीचा पंचसूत्री कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. कोरोना संकटात आर्थिक अडचणींवर मात करुन विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अहमदनगर जिल्हा अग्रेसर आहे. या जिल्ह्याच्या विकासामध्ये कर्मवीर शंकरराव काळे यांचे योगदान मोठे आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांचा पूर्णाकृती पुतळा कोपरगावकरांना प्रेरणादायी ठरेल तसेच नागरिकांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी  केले.

कोपरगाव शहराच्या विकासासाठी नदी संवर्धन, रस्ते विकास तसेच बस स्थानक परिसरात बीओटी तत्त्वावर व्यापारी गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डासमुक्त आणि आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छ कोपरगावसाठी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केली.

येत्या महाराष्ट्र दिनी नागपूर-मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. कोपरगावच्या विकासासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले.  या विकास कामांमुळे कोपरगावचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, नागरिक केंद्रस्थानी ठेवून कोपरगाव शहराच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी दिर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी, तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोना संकटावर मात करुन विकास कामांना मोठा निधी शासनाने दिला असून पंचायत समिती इमारतीसह अन्य वास्तूंचे बांधकाम उच्च दर्जाचे झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकामध्ये आमदार आशुतोष काळे यांनी विकास कामांची माहिती सांगितली. सुमारे एकशे एकतीस कोटी रुपये खर्चाची कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याची योजनेला मान्यता मिळाल्याची माहिती दिली.  कोपरगाव येथे एसटी बस डेपोला मंजूरी मिळावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला पदाधिकारी, स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

कोपरगाव येथे चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असलेल्या पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याहस्ते आज झाले.  उद्घाटनानंतर इमारतीमधील विविध विभागांच्या दालनांची मान्यवरांनी पाहणी केली.

बस स्थानकाच्या आणि पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्धाटन

कोपरगाव येथे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असलेल्या बस स्थानक इमारतीचे तसेच चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याहस्ते आज झाले.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *