GST department arrests facilitator for bogus bills of Rs 2,215 crore
रु. २,२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस दि.०४ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली.
मे. साई गुरु एन्टरप्राईज व इतर आठ कंपन्यांबाबत वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात या सर्व बोगस कंपन्या नंदकिशोर बालूराम शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले.
नंदकिशोर शर्मा हा अशा प्रकारच्या २६ बोगस कंपन्या चालवत असून, या कंपन्यांमार्फत आतापर्यंत २२१५ कोटी रुपयांची बोगस बिले बनवण्यात आलेली आहेत. या बोगस बिलांमध्ये हिरे, कपडे, स्टील इत्यादी वस्तूंच्या बिलांचा समावेश असल्याचे चौकशीत आढळून आले. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाला १२६ कोटी रुपयांची करचोरी उघड करण्यात यश आले आहे.
या कारवाईमध्ये सहायक राज्यकर आयुक्त गणेश रासकर यांनी या प्रकरणातील आरोपी नंदकिशोर शर्मा यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यांतर्गत अटक केली आहे. महानगर दंडाधिकाऱ्यांनी शर्मा यांस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही धडक कारवाई सहायक राज्यकर आयुक्त गणेश रासकर, अविनाश ब. चव्हाण, संजय मो. शेटे व इतर सहायक राज्यकर आयुक्त यांनी संयुक्तपणे राबविली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहिले. ही संपूर्ण कारवाई संजय वि. सावंत, राज्यकर उपआयुक्त व राहूल द्विवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण अ. मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
श्री.द्विवेदी यांनी नुकताच राज्यकर सहआयुक्त अन्वेषण अ, मुंबई या पदाचा कार्यभार स्वीकारला असून, केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत बोगस बिलांसंदर्भात मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या मोहिमेतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कडक इशारा दिलेला आहे.
Hadapsar News Bureau