Mulshi Phase II proposal will be approved soon as per water demand: Deputy Chief Minister Ajit Pawar
पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : तालुक्यातील वाढते नागरिकीकरण त्यानुसार वाढत जाणारी पाण्याची मागणी विचारात घेवून मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मुळशी तालुक्यातील भुकूम ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
ग्रामपंचायतीमध्ये एकोपा टिकवून ठेवण्याचे आवाहन करून श्री.पवार म्हणाले, ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर मंत्रालय म्हणून ओळखले जाते. त्यामाध्यमातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायत छोटी असली तरी त्यांची क्षमता मोठी आहे. स्थानिक पातळीवरील विविध विकास कामे करुन स्थानिक नागरिकांच्या समस्येचे निराकरण करत त्यांना न्याय देण्याचे काम करता येते. गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, त्यांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे.
विकासकामे करतांना दूरदृष्टी ठेवली पाहिजे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतांना स्वार्थ बाजूला ठेवून वेळेत मार्गी लावली पाहिजे. गावाची हद्दवाढ होतांना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते भुकुम ग्रामपंचायतीचे सन २०२१-२२ वर्षाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
Hadapsar News Bureau.