Skill development is the key to future development – Rajesh Tope
कौशल्य विकास हाच भविष्यातील विकासाचा मूलमंत्र-राजेश टोपे
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट संस्थेचा ११ वा दीक्षांत सोहळा
पुणे : जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानासोबत मूल्याचीही आवश्यकता असून कौशल्य विकास हाच भविष्यातील यशाचा आणि विकासाचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य आणि कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी केले.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट संस्थेच्या ११ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला आयआयएम अहमदाबादचे माजी संचालक प्रा.जहर सहा, पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्रित, अरविंद हली, विवेक शर्मा, नागराज गरला, भास्करबाबू रामचंद्रन आदी उपस्थित होते.
श्री.टोपे म्हणाले, आज जगात ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्ञानासोबत कौशल्य आत्मसात करावे. एखाद्या कल्पनेला आर्थिक मूल्य असलेल्या उत्पादन किंवा सेवेत परिवर्तित करणाऱ्या सृजनशिलतेचा ध्यास धरावा आणि उद्योगाकडे वळावे. राज्य आणि केंद्र शासन नवोद्योजकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. पुण्यातदेखील नवोद्योजकांसाठी अनुकूल वातावरण आहे.
शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जीवनात येणारी यश-अपयशाचा विचार न करता उद्दिष्टावर लक्ष केंद्रीत करावे. बुद्धीवर नियंत्रण, प्रयत्नातील निरांतरता, धैर्य, आत्मविश्वास, लढण्याची प्रवृत्ती, कठोर परिश्रम आणि वेळेच्या व्यवस्थापनाने यश मिळविता येते. ज्ञान समाजातील तुमचे वेगळेपण सिद्ध करते आणि मूल्य जीवनाला आधार देतात. दोन्हीच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवावे आणि पीआयबीएमचे विद्यार्थी आदर्श नागरिक म्हणूनही ओळखले जावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट संस्थेत विद्यार्थ्यांसाठी प्रेरक वातावरण आणि चांगल्या सुविधा असल्याबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेला कौशल्य आणि डिजिटल विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे श्री.टोपे यांनी सांगितले
यावेळी श्री. सहा आणि रमण प्रित यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. श्री.टोपे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Hadapsar News Bureau