Private hospitals are allowed to charge a maximum service fee of Rs.150 / – for a booster dose for adult citizens
प्रौढ नागरिकांच्या वर्धक मात्रांसाठी खासगी रुग्णालयांना जास्तीत जास्त १५०/- रुपये सेवाशुल्क घेण्याची परवानगी
नवी दिल्ली : खाजगी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरच्या लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा द्यायला परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांच्या आरोग्य सचिवांसोबत मार्गदर्शनपर बैठक घेतली.
लसीकरण केंद्राच्या व्यवस्थेसंबंधी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं सर्व खाजगी लसीकरण केंद्रांना बंधनकारक असेल, लसींच्या आखून दिलेल्या किंमतीपलिकडे, लसीकरण सेवा शुल्क म्हणून जास्तीत जास्त दीडशे रुपयांचं शुल्क आकारता येईल असे निर्देश आरोग्य सचिवांनी या बैठकीत दिले.
कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत दिल्या जात असलेल्या वर्धक मात्रेसाठी, लाभार्थ्याने याआधी जी लस घेतली असेल, तीच लस दिली जाईल, लाभार्थ्यांनी आधीच्या दोन मात्रांकरता कोविनवर नोंदणी केलेली असल्यानं, वर्धक मात्रेसाठी पुन्हा नव्यानं नोंदणी करायची आवश्यकता नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरु असलेला मोफत कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम तसाच सुरु राहील.
या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना पहिली आणि दुसरी मात्रा, तर आरोग्य कर्मचारी, आघाडीवर राहून काम करत असलेले कोरोना योद्धे आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना वर्धक मात्रा, विनामूल्य दिली जाईल याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
Hadapsar News Bureau.