जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

World Heritage Day: Archaeological Survey of India organises several programmes in Maharashtra

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : भारतीय पुरातत्व विभाग, भारत सरकार, मुंबई विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ – नाट्य शाखा, रंग मंच सहयोगी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच जागतिक वारसा दिनानिमित्त 18 एप्रिल 2022 रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

देशाच्या समृद्ध वारशाविषयी जनजागृती करणे, लोकांना त्यांची माहिती देणे, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.

जागतिक वारसा दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या, मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याची निवड केली आहे. या प्रसंगी वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं, सुप्रसिद्ध मराठी नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ सादर करण्यात येत आहे.

रायगडावरील राज सदरेवर मुंबई मराठी साहित्य संघ – नाट्य शाखा, रंग मंच सहयोगीचे कलाकार हे नाटक सादर करत आहेत. आजच्या  दिवसाचे दुसरे आकर्षण म्हणजे ‘रायगडावरील उत्खनन आणि संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित छायाचित्र प्रदर्शन. संरक्षण आणि संवर्धनाची अत्यंत निकड असलेल्या आपल्या वारशाबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने 18 एप्रिलचा प्रदर्शनातला प्रवेश आणि संध्याकाळचा नाटकाचा प्रयोग निःशुल्क आहे.

औरंगाबाद मंडळाचा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, विभाग यानिमित्त, वेरूळ लेण्यांमध्ये जागतिक वारसा दिन आणि “आझादी का अमृत महोत्सव” चं औचित्य साधत आज संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम आयोजित करत आहे.

औरंगाबाद मंडळाच्या विविध वास्तू/पुरातत्व स्थळांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे वेरूळच्या लेणी क्रमांक 16, इथे आयोजन केले आहे. क्राफ्ट ऑफ आर्टचे संस्थापक, कलात्मक संचालक बिरवा कुरेशी यांच्या सहकार्याने औरंगाबाद मंडळाने एक सांस्कृतिक महोत्सव “त्रिकाल” आयोजित केला आहे. तबलावादक उस्ताद फजल कुरेशी, गायक आनंद भाटे, बासरीवादक राकेश चौरसिया, सारंगीवादक दिलशाद खान, मृदुंगवादक श्रीधर पार्थसारथी, किबोर्ड वर संगीत हळदीपूर, ड्रम्सवादक गिनो बँक्स, आणि बास गिटार वर शेल्डन डिसिल्वा, यांच्यासारख्या प्रसिद्ध कलाकार- संगीतकारांच्या बहारदार कार्यक्रमाचा आनंद रासिकांना मिळणार आहे.

त्याआधी, आज सकाळी औरंगाबाद विभागानं, टोम्ब ऑफ राबिया दुर्हानी (बीबी का मकबरा) इथं वारली चित्रकलेविषयीची एक सांस्कृतिक कार्यशाळा आयोजित केली होती. किरण नद्र कला संग्रहालयाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून काल घारापुरी लेण्यांच्या परिसरात भारतीय पुरातत्व विभाग, सेंट झेवियर महाविद्यालय, संग्रहालय संस्था, मुंबई यांच्यासह स्थानिक इतिहास संस्था यांनी संयुक्तपणे चर्चासत्र देखील आयोजित केले होते. या चर्चासत्रात सेंट झेवियर महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्थानिक गाईड, आणि ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 80 लोकांनी सहभाग घेतला.

या चर्चासत्रात तज्ञांनी वारसास्थळांशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा केली. डॉ राजेंद्र यादव, वरिष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ, पुरातत्व विभाग, यांनी वारशाचे महत्व, त्यांचे संरक्षण आणि भारतातील जागतिक वारसास्थळे याविषयी माहिती दिली. प्राध्यापक अनिता रहाणे यांनी, घारापुरी लेण्यांच्या विशेष संदर्भाने, पश्चिम भारतातील लेण्यांचे स्थापत्यशास्त्र या विषयावर विवेचन केले. डेक्कन महाविद्यालयाच्या प्राध्यापक श्रीकांत जाधव यांनी लेण्यांच्या आणि पश्चिम भारतातील लेण्यांच्या जिओमॉर्फोलॉजी विषयी विवेचन केले.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *