Maharashtra NCC Group Commanders Annual Conference Important decisions of Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्रातील युवकांना सैन्यात अधिकारीपदावर संधी सुकर होण्यासाठी राज्यात एनसीसी संघटन अधिक भक्कम व व्यापक करण्याचा निर्णय
एनसीसी छात्रसैनिकांच्या उत्कृष्ट प्रशिक्षण व्यवस्थेसाठी औरंगाबाद व पुण्यात एनसीसी संकूल उभारण्याचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना सैन्यदलात अधिकारीपदावर संधी मिळणे सुकर व्हावे, यासाठी राज्यात राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) संघटन अधिक व्यापक व भक्कम करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनसीसीच्या राज्यातील ग्रुप कमांडर्सच्या बैठकीत घेण्यात आला.
एनसीसी छात्रसैनिकांना मैदानी स्पर्धा, कवायत, नेमबाजी प्रशिक्षणासाठी कायमस्वरुपी शिबीर व्यवस्था म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात पुणे आणि औरंगाबाद येथे ‘एनसीसी प्रशिक्षण संकुल’ उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला.
नंतरच्या टप्प्यात मुंबई, नागपूरसह अन्यत्रही ‘एनसीसी प्रशिक्षण संकुल’ उभारण्यात येणार आहेत. एनसीसी छात्रसैनिकांच्या न्याहरी भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रउभारणीतले महत्व लक्षात घेऊन एनसीसीच्या उपक्रमांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महाराष्ट्रातील एनसीसी ग्रुप कमांडर्सची वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एनसीसी कार्यालयांसाठी लिपिकवर्गीय पदे बाह्यस्त्रोतांद्वारे भरणे, एनसीसीला प्रशिक्षण निधीचे आगावू वितरण करणे, स्वतंत्र राज्य कक्षाची निर्मिती करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र एनसीसीच्या छात्रसैनिकांनी सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी बजावली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरातही राज्य एनसीसीसी संचालनालयाने सर्वोत्कृष्ट पथकाचा मान तसेच मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल महाराष्ट्र एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र एनसीसीच्या छात्रसैनिकांच्या माध्यमातून राज्याची लष्करीसेवेची, देशसेवेची परंपरा कायम राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत व्यक्त केला.
हडपसर न्युज ब्युरो (Hadapsar News Bureau)