95th All India Marathi Sahitya Sammelan begins in Udgir
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उदगीरमध्ये सुरुवात
उदगीर : लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी ग्रंथ पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
ग्रंथदिंडीत उदगीर शहर आणि तालुक्यातल्या विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, विद्यार्थिनी विविध पोशाखात सहभागी झाले होते. शाळा आणि महाविद्यालयांनी तयार केलेल्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
त्यानंतर ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन झालं. संमेलनाचं औपचारिक उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
देशात मराठी भाषा बोलणारे दुसऱ्या आणि जगात 10 व्या क्रमांका वर आहेत. राज्यातलं आघाडी सरकार मराठी भाषेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असं यावेळी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात द्यावा, अशी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी केली.
मराठी भाषा ही भारतीय भाषा समूह मध्ये सर्वाधिक संपन्न भाषा असून, तिच्या बद्दल मला प्रचंड आदर आहे. पुढील साहित्य संमेलन गोव्यात भरावा कोकणी माणूस त्याला प्रतिसाद देईल असा शब्द देतो, अशी ग्वाही संमेलनाचे प्रमुख पाहुणे दामोदर मावजो यांनी दिली.संमेलनासाठी, देशभरातल्या सुमारे एक हजारावर मराठी साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी आज निमंत्रितांचं कवी संमेलन होणार आहे. तसंच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – काय कमावले, काय गमावले? या विषयावर, मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण – किती खरे, किती खोटे?, मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्रीवादात अडकले आहे का?, मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू यांचं भाषिक आणि सांस्कृतिक अनुबंध, आणि लेखक आणि लोकशाही मूल्ये, या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तसंच लोककलेमध्ये जागरण, गोंधळ, भारुड, पोतराज, दंडार, घुसाडी आदी नृत्यांचं सादरीकरण होणार आहे.
संमेलन स्थळाचं ‘भारतरत्न लता मंगेशकर साहित्यनगरी’ असं नामकरण करण्यात आलं असून, विविध कार्यक्रमांसाठी सात व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी शहरातल्या मुख्य मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
हडपसर न्युज ब्युरो ( Hadapsar News Bureau)