व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख शिक्षण तसेच चरित्र निर्माणासाठी शिक्षण क्षेत्रात सांघिक प्रयत्न गरजेचे

Gadkari inaugurates two-day educational leadership conference

व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख शिक्षण तसेच चरित्र निर्माणासाठी शिक्षण क्षेत्रात सांघिक प्रयत्न गरजेचे-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

दोन दिवसीय शैक्षणिक नेतृत्व परिषदेचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : भारतामध्ये गरीबी, बेरोजगारी,  दरडोई उत्पन्न यासारख्या विविध समस्या असताना शिक्षणाचा उपयोग होण्यासाठी हे शिक्षण व्यवसायाभिमुख  तसेच रोजगाराभिमुख असणे आवश्यक असून या शिक्षणाने आपला गौरवशाली इतिहास आणि संस्कार आधारित भविष्यातील नागरिकांचे चरित्र निर्माण करावे. शैक्षणिक संस्थांच्या विचार मंचानी  याबाबत सांघिक प्रयत्न करणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले .

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था – व्हीएनआयटी ,भारतीय शिक्षण मंच तसेच रिसर्च फोर रिसर्जन्स फाउंडेशन – आरएफआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शैक्षाणिक नेतृत्व परिषदचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्हीएनआयटी चे संचालक डॉ . प्रमोद पडोळे, सोलार इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपुरात असणाऱ्या नीरी तसेच व्हीएनआयटी सारख्या संस्थांनी येथील दैनंदिन प्रश्नांवर लक्ष देणे आवश्यक असून इलेक्ट्रिक हायवे , ट्रॉली केबल बस , नाग नदीचे प्रदूषण यासारख्या विषयावर या संस्थांनी संशोधन करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितलं .

योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून टाकाऊ पासून संपत्ती निर्माण करणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला . उद्यमशिलता व्यवस्थापन सारखा विषय सुद्धा शिक्षण प्रणालीमध्ये आवश्यक असून ज्ञानाचा उपयोग हा आवश्यकता आधारित दृष्टिकोनाने करायला हवा . आपल्या देशात असणाऱ्या सेमीकंडक्टरची त्रुटी , स्टील उद्योगात पर्यायी वस्तूचा वापर या विषयावर सुद्धा पर्याय शोधले पाहिजे असं  आवाहन त्यांनी केले.

व्हीएनआयटी चे संचालक डॉ . प्रमोद पडोळे यांनी यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्वसमावेशक दृष्टिकोन , क्रेडिट बँक , भारतीय लैंग्वेज मिडीयम , संशोधन सुधारणा अशा विविध विषयावर या दोन दिवसीय परिषदेमध्ये आठ सत्राव्दारे चर्चा होणार असल्याचे सांगितलं.

सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं की भारतीय संस्कृतीला जोडणारी तसेच व्यक्ती मध्ये संस्कार आणि संवेदना निर्माण करणारी शिक्षण प्रणाली निर्माण होणे गरजेचे आहे.

याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते रिसर्च फोर रिसर्जन्स फाउंडेशनच्या डाटा जर्नल ‘तथ्य ‘ चे  प्रकाशन करण्यात आले. व्हीनआयटी मधील सिमेन्स टेक्नोलॉजी सेंटरचे आणि सभागृहाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये भारतातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू तसेच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थाचे संचालक उपस्थित आहेत .

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *