Massive damage due to unseasonal rains in various parts of the state
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान
मुंबई : राज्याच्या विविध भागात काल अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. हिंगोली जिल्ह्यात रात्री मेघगर्जनेसह ,वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
वसमत तालुक्यातील बाराशिव हनुमान येथे हळद झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. काल झालेल्या पावसामुळे कळमनुरी , औंढा, वसमत, सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं डिग्रस कराळे परिसरात झाड कोसळून वाहतूक बंद झाली.
चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर आणि कोरपना तालुक्यात गारपीट आणि जोरदार पाऊस झाला असून चंद्रपूर आणि आसपासच्या तापमानात मोठी घट झाली आहे. सांगली जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला. या पावसाने घरांची पडझड झाली असून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यासह काही ग्रामीण भागात आज मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर, लांजा, देवरूख आदी परिसरात पाऊस झाला.
मात्र आज पहाटे रत्नागिरी शहर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
उस्मानाबाद इथं आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे उन्हाळी सोयाबीन, तसेच हळद आणि आंबा पिकांचं नुकसान झालं.
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील पंढरपूर , सांगोला ,मंगळवेढा , मोहोळ, माळशिरस , अशा सर्वच तालुक्यात आज पहाटेपासून मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस आल्याने मोठ्या प्रमाणावर द्राक्ष , आंबा, डाळिंब अशा फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.
दक्षिण कोकणच्या किनारपट्टीवर, अरबी समुद्रावर मध्यम प्रकारचे ढग आले असून मुंबई, ठाणे, पुणेसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भाग अंशतः ढगाळलेले राहिल असं हवामान विभागानं कळवलं आहे.
हडपसर न्युज ब्युरो