CGST Mumbai South Commissionerate has detected tax evasion of Rs. 876 Crores
दक्षिण मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयाने 876 कोटींची करचोरी पकडली
दक्षिण मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयाने (सीजीएसटी) 11.07 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी सह-सूत्रधाराला केली अटक; मालकाला आधीच झाली आहे अटक
मुंबई : दक्षिण मुंबई वस्तू आणि सेवाकर आयुक्तालयाच्या करचुकवेगिरी प्रतिबंधक पथकाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) प्रकरणी मेसर्स न्यू लक्ष्मीलाल अँड कंपनीच्या (GSTIN 27ACAPS6257K1ZS) सह-सूत्रधाराला अटक केली आहे.
मालाचा प्रत्यक्षात व्यवहार न करताच 62.90 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या बनवून त्यांनी 11.07 कोटी रुपयांचा आयटीसी लाटला आहे. सीजीएसटी मुंबई विभागाने करचोरांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेचा ही कारवाई एक भाग होती.
मेसर्स न्यू लक्ष्मीलाल अँड कंपनीला अस्तित्वातच नसलेल्या सात कंपन्याच्या बनावट पावत्या पुरवल्याचे आरोपीने कबूल केले आहे.
सापडलेले प्रत्यक्ष पुरावे आणि त्याच्या कबुली जबाबाच्या आधारावर, सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 नुसार कलम 132(1) (b) आणि (c) सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132(5) नुसार गुन्हा केल्याबद्दल आरोपीला अटक केली.
त्याला आज 26 एप्रिल 2022 रोजी मुंबईच्या अतिरिक्त सीएमएम न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मेसर्स न्यू लक्ष्मीलाल अँड कंपनीच्या मालकाला डिसेंबर 2021 मध्येच 62.90 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांच्या आधारे बनावट आयटीसी मिळवून त्याचा वापर केल्याबद्दल अटक झाली आहे.
दक्षिण मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने या मोहिमे अंतर्गत गेल्या सात महिन्यात 876 कोटींची करचोरी पकडली, अंदाजे 14.4 कोटी रुपये वसूल केले तर आठ जणांना अटक केली आहे.
सीजीएसटी विभाग संभाव्य करचोरांना हुडकण्यासाठी अत्याधुनिक आणि प्रगत डेटा विश्लेषणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करत आहे. कर चुकवणाऱ्यांना पकडण्यासाठी विभाग इतर कर आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या प्राधिकरणांशी समन्वय साधत आहे.
हडपसर न्युज ब्युरो